
मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्या येणारी ‘नीट’ आणि इंजिनियरींग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई-मेन परीक्षा पुढे ढकलण्यास देशातील शिक्षणतज्ज्ञांनी विरोध दर्शवला आहे. या परीक्षा पुढे ढकलणे म्हणजे विद्याथ्र्यांच्या भवितव्याशी तडजोड केल्यासारखे होईल असे मत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.
येत्या सप्टेंबरमध्ये या दोन्ही परीक्षा होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. परंतु देशातील सुमारे 150 शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधानांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. काही मंडळी त्यांचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी नीट, जेईई परीक्षांचे राजकारण करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहेत असे त्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. या परीक्षांच्या तारखा सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यात आणखी बदल केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल अशी भीतीही पत्रात व्यक्त केली गेली आहे.
विद्यार्थी आणि तरूण हे देशाचे भवितव्य आहे. परंतु कोरोनामुळे त्यांच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. प्रवेश प्रक्रिया आणि वर्ग याबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे असे या पत्रात म्हटले आहे.
या पत्रावर पवई येथील आयआयटी मुंबई, दिल्ली विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, लखनौ विद्यापीठ, जेएनयू, बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयटी दिल्ली यांच्याबरोबरच लंडन विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, द हिब्रू विद्यापीठ आणि इस्त्रायलच्या बेन गुरीओन विद्यापीठातील हिंदुस्थानी शिक्षणतज्ज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत. केंद्र सरकार सुरक्षा उपाययोजना करून या परीक्षा सुरळीत पार पाडेल असा विश्वासही पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.


























































