पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा साथीदार दिल्लीत गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ल

जम्मू-कश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशवादी हल्ल्याचा तपास करणाऱया पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्याचा सूत्रधार मुद्दस्सिर याचा जवळचा साथीदार आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान (27) याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सज्जाद खान हा पुलवामाचा रहिवाशी असून त्याला येथील लजपत राय मार्केटमधून पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा उचलले. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुद्दस्सिर हा कश्मीरात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेला आहे. या मुद्दस्सिरने सज्जाद खानकडे दिल्लीत स्लिपर सेल तयार करण्याचे महत्त्वाचे काम सोपवलेले होते. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पोलीस उपआयुक्त प्रमोद सिंग खुशवाह यांनी दिली. या सज्जादला पकडल्याने हे सुरक्षा दलासाठी मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुलवामा हल्ल्याचा उलगडा होण्यात मदत होणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी सज्जादची पुलवामा हल्ल्यासंदर्भात कसून चौकशी करीत आहेत.

हल्ल्यासाठीच सज्जादने कार खरेदी केली
पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्या अगोदर 10 दिवस मारुती इको कार ही सज्जाद खानने खरेदी केली होती. याच मारुती कारमध्ये स्फोटके भरून ही कार आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याने सीआरपीएफ जवानांच्या वाहनांच्या ताफ्यात घुसवली. यात 40 जवान शहीद झाले.