
ज्वेलर्सच्या दुकानातून 30 लाखांचे दागिने चोरून पळालेल्या नोकराला पवई पोलिसांनी अवघ्या सहा तासांत गजाआड केले. हिरालाल लेहरूलाल कुमावत असे त्याचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी हिरालाल हा जुगारात हरल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
हिरालाल हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. त्याला जुगाराचा नाद असल्याने तो कर्जबाजारी झाला होता. दहा दिवसांपूर्वी हिरालाल हा पवईच्या रिया गोल्ड या दुकानात सेल्समन म्हणून कामाला राहिला. बुधवारी दुकानाचे मालक अशोक कुमार मांडोत हे दुपारी जेवायला दुसऱया दुकानात गेले तेव्हा जेवणासाठी पोटमाळ्यावर गेलेला हिरालाल पुन्हा दुकानात आला. त्याने दुकानातून 30 लाखांचे दागिने चोरून ते बॅगेत भरले. त्यानंतर दुकानाची चावी शेजारील दुकानदाराकडे देऊन हिरालालने पळ काढला. सायंकाळी अशोक कुमार हे दुकानात आले असता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवई पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिमंडळ 10 चे उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक आबूराव सोनावणे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक विनोद पाटील, यश पालवे यांनी तपास सुरू केला. दुकानात चोरी करण्यापूर्वी हिरालालने राजस्थानला जाण्यासाठी सकाळीच एका खासगी कंपनीची गाडी बुक केली होती. त्या गाडीची माहिती पवई पोलिसांना मिळाली. ती गाडी राजस्थानला जात असल्याने त्याची माहिती पालघरच्या कासा पोलिसांना दिली, तर पवई पोलीसदेखील हिरालालचा पाठलाग करत होते. कासा पोलिसांनी नाकाबंदी करून हिरालालला ताब्यात घेत त्याची माहिती पवई पोलिसांना दिली. काही वेळातच पवई पोलीस कासा पोलीस ठाण्यात पोहोचले. पवई पोलिसांनी हिरालालला अटक करून मुंबईत आणले. त्याच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले आहेत.
जामिनावर बाहेर येताच पुन्हा चोरी
जुगारात हरल्याने गावी कर्जदार वारंवार पैशांची मागणी करत असल्याने हिरालालने मुंबईत ज्वेलर्सच्या दुकानात चोरीचा कट रचला. गेल्या महिन्यात हिरालाल नोकरीच्या शोधात नवी मुंबई येथे आला. त्याच्या परिचित असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात काही दिवस नोकरी केली. त्यानंतर त्याने दुकानातच चोरी केली. चोरीच्या गुह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर येताच हिरालाल हा पवई येथे अशोक कुमार यांच्या दुकानात कामाला लागला. चोरी करून दागिने घेऊन गावी पळून जायचे आणि कर्जदाराचे पैसे त्यांना परत करायचे असा कट हिरालालने रचला होता.



























































