वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सांडपाणी प्रकल्प; विविध कामे, प्रसाधनगृहे यांसाठी होणार पाण्याचा पुनर्वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे दररोज 5 लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता उद्यान कामांसाठी, पक्षी, प्राणी यांच्या जलक्रीडेसाठी, पक्षी व प्राणी यांचे पिंजरे धुण्यासाठी, स्वछतेसाठी, प्रसाधनगृहासाठी आणि इतर कामांसाठी करता येणार आहे.

मुंबईकरांना दररोज सात तलावांमधून 3 हजार 850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. मात्र तरीही मुंबईकरांच्या पाण्याबद्दलची वाढती मागणी लक्षात घेऊन महापालिका अतिरिक्त स्रोत निर्माण करण्यावर आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरण्यावर भर देत आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दररोज सुमारे 3 ते 5 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असल्याने महानगरपालिकेच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून न राहता स्वबळावर सर्व सुविधा चालवण्याच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात आलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पक्ष्यांचे नंदनवन, माकड प्रदर्शनी, ‘बायोम’ थीमवर आधारित उद्यान या सुविधांचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी आमदार यामिनी जाधव, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव कुमार, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.