जिंतूर शहरात पाण्यासाठी महिलांची वणवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूर शहरात पाण्यासाठी अबाल- वृद्ध, महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. एकीकडे कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे तर दुसरीकडे लॉकडाऊन मध्ये पाण्यासाठी महिलांना घराबाहेर पडावे लागत आहे. रमजान महिन्यामध्ये उपवास आहेत. कडक ऊन्हात महिला पाणी भरण्यासाठी घरा बाहेरपडत आहेत.

मुख्य शहरातील माळी गल्ली, कोठेकर गल्ली, गवळी गल्ली, यांना अजिबात पाणी येत नसल्याने नगरसेवक विलास भंडारी यांना महिलांनी चांगलेच धारेवर धरले आहे. नगरसेवक यांनी नगराध्यक्ष यांना वारंवार फोन करून सुध्दा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे मागील आठवड्यात जनतेला पिवळे पाणी प्यावे लागले, आणि आता काही भागात 3 ते 4 टक्के पाणी, तर त्याच गल्लीत काही जणांना पाण्याचा थेंब सुध्दा मिळत नाही. नागरिकांनी तक्रारी करून सुध्दा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिंतूर नगर पालिकेत पाण्याचे नियोजन नसल्याने व अधिकारी नसल्याने शहरात 8 दिवसात एकदा नळाला पाणी सोडले. या बाबीकडे न.प.ने लक्ष देण्याची मागणी नागरिकामधून केली जात आहे.