जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन

मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महिला पदाधिकाऱयाचा कथित विनयभंग केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुह्यात आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर आव्हाडांना काही अटी शर्तींसह 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

भाजप महिला पदाधिकाऱयाच्या तक्रारीनुसार आव्हाडांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आव्हाड यांनी आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्याचे पडसाद राज्यात उमटले. मुंब्य्रातही या प्रकरणानंतर जाळपोळ आणि दुकाने बंद करण्यात आली. याचदरम्यान आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्यावर सोमवारी न्यायालयाने आव्हाडांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत अटक करू नये असे म्हटले. याप्रकरणी आज सकाळी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासंदर्भात सुनावणी सुरू झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर दुपारी 2 वाजता अटी शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

पोलिसांवर दबाव कोण टाकतोय?
माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी तो व्हिडीओ बघायला पाहिजे होता. ती महिला स्वतः म्हणते माझा अपमान झाला, मला राग आला. मग माझ्यावर कलम 354 लावण्यासाठी हे निकष आहेत का? काही न वाचता फक्त गुन्हे दाखल केले जातात. मला पोलिसांची एक गोष्ट आवडते. कारवाई करताना त्यांना काही विचारलं की ते म्हणतात, साहेब, काय सांगू ओ तुम्हाला, तुमचे आणि आमचे संबंध किती चांगले आहेत हे तुम्हाला माहिती आहे, पण वरून खूप दबाव आहे, असे पोलिसांकडून सांगितले जाते. अशा प्रकारचा दबाव कोण टाकत आहे, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

माझ्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता त्या महिलेला माझ्या नावाने धमकीचे खोटे पह्न केले जात आहेत. माझ्यावर पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल करून माझ्याविरुद्ध तडीपारीची नोटीस काढायची असा डाव सध्या शिजत आहे.
– जितेंद्र आव्हाड