
सामना प्रतिनिधी। चिरनेर
उरणमध्ये जेएनपीटी बंदरामुळे औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. तर दुसरीकडे मात्र याच परिसरात गावठी दारू बरोबरच अंमली पदार्थांची विक्रीही सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जेएनपीटी परिसरात जेएनपीटीच्याच जागेवर अधिकारी वर्गाच्या वरदहस्ताने अनधिकृतपणे टपऱ्या, खाद्यपदार्थांची विक्री करणारे अनेक व्यवसाय सुरू आहेत. या व्यवसायाबरोबर गावठी दारूसह देशी विदेशी बनावट दारूची व गुटखा,गांजाची सर्रासपणे खुलेआम विक्री सुरू आहे. यातून त्यांना अमाप पैसा मिळत आहे. याबाबत विचारणा केली असता मी सर्वांना नियमित हप्ता देत असल्याने माझी कोणेच काही वाकडे करू शकत नाही अशी दपोक्ती येथील अरुण, सुरेश नावाचे माफीया करीत आहेत. या परिसरात वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावरील चालक हे दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी या अंमली पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. यामुळे दिवसभरात हजारों रुपये या गैरमार्गातून मिळत असल्याने अंमली पदार्थांची खुलेआम दिवसरात्र विक्री सुरू आहे. नशापान करून चालक वाहन चालवित असल्याने अपघातामध्येही वाढ झाल्याचे दिसून येते.
या परिसरात हाकेच्या अंतरावर असणाऱ्या न्हावा-शेवा पोलीस ठाण्याला याची माहिती नाही. तरी पोलिसांनी अशाप्रकारे अंमली पदार्थांची विक्री करणारे अरुण, सुरेश माफियांना गजाआड करून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

































































