‘जेएनयू’ हल्ल्याचे देशभर पडसाद; अमित शहा राजीनामा द्या – ट्विटरवर ट्रेण्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) घुसून विद्यार्थ्यांवर अज्ञात गुंडांनी केलेल्या भयंकर हल्ल्यामुळे अवघा देश ढवळून निघाला आहे. मुंबई, पुणे, लखनौ, चंदीगड, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नईसह अनेक शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यांवर उतरले. या हल्ल्याचा उद्योगजगत, बॉलिवूडसह सर्व स्तरातून निषेध होत आहे. सोशल मिडियावरही केंद्र सरकार विरोधात मोहिम सुरू झाली असून गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या, हा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. दरम्यान, काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेऊ, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
‘जेएनयू’ कॅम्पसमधील साबरमती हॉस्टेलमध्ये आणि परिसरात घुसून रविवारी रात्री चेहरा कपडय़ाने झाकलेल्या अज्ञात गुंडांनी विद्यार्थ्यांवर भीषण हल्ला केला.

लाठय़ा-काठय़ा, लोखंडी रॉडने विद्यार्थी-विद्यार्थिनींना बेदम मारहाण करण्यात आली. यात अनेकांचे डोके फुटले. प्राध्यापकही जखमी झाले. ‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयीषा घोष यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विद्यार्थ्यांवर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू आहे.

विद्यार्थ्यांमध्ये खळबळ; अनेक ठिकाणी आंदोलने
तोंडावर कपडे बांधून अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बेदम मारहाणीचे पडसाद देशभर उमटले. मुंबईत गेट-वे ऑफ इंडियासमोर हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
पुण्यात रविवारी रात्री ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. सोमवारी गरवारे महाविद्यालयाबाहेर तीक्र आंदोलन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी येथे उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.
दिल्लीत जेएनयू विद्यापीठात सोमवारी तणावाचे वातावरण होते. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करीत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध घोषणा दिल्या.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांनी ‘तिरंगा मार्च’ काढला. ‘एएमयू’सह बनारस हिंदू विद्यापीठातही पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.
जयपूर येथे राजस्थान विद्यापीठात अभाविप आणि एनएसयूआय कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांमध्ये धुमश्चक्री झडली.
लखनौमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
हैद्राबाद येथे उस्मानिया विद्यापीठ, कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. कोलकाता येथे भाजप आणि डाव्या संघटनांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलीसांनी लाठीमार केला.
चंदीगड, बंगळुरू येथेही मोठे आंदोलन सुरू झाले आहे.

केंद्राची बैठक; कुलगुरूंना दूर ठेवले
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची बैठक झाली. सचिव अमित खरे यांनी बोलविलेल्या या बैठकीला ‘जेएनयू’ प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, कुलगुरू एम. जगदीश कुमार हजर नव्हते. कुलगुरूंना बैठकीपासून दूर ठेवल्याचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, ‘जेएनयू’ प्रशासनाकडे केंद्राने अहवाल मागितला आहे.

हा पूर्वनियोजित हल्ला – घोष
रविवारी झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. ‘जेएनयू’तील सुरक्षारक्षक आणि हल्लेखोर यांचे संगनमत होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचाराचे प्राध्यापक हिंसाचार घडविण्यासाठी प्रोत्साहन देत होते, असा आरोप ‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा अयीषा घोष यांनी केला आहे. संघाशी संबंधित अभाविपच्या गुंडांनी केलेला हा हल्ला आहे. माझ्यावर डोक्यावर अनेक वेळा लोखंडी रॉडने मारहाण करून मला रक्तबंबाळ केले. ‘जेएनयू’मधील हिंसाचार थांबला पाहिजे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. कुलगुरू जगदीश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही घोषने केली आहे.

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये जोरदार झटापट झाली. तेव्हा पोलिसांनी लाठीमार केला.

‘गेट वे’वर 24 तास ठिय्या
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी मुखवटेधारी गुंडांनी घुसून विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. रविवारी मध्यरात्रीपासूनच विद्यार्थ्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे जमून ठिय्या आंदोलन केले. यावेळी मेणबत्त्या पेटवून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला गेला.