‘जेएनयू’ हिंसाचार; आइशी घोषसह नऊ जणांवर ठपका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी जेएनयू स्टुडंट युनियनची अध्यक्षा आइशी घोषसह नऊ जणांवर ठपका ठेवला आहे. याप्रकरणी संबंधित 9 संशयितांचे छायाचित्रे जारी केली आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांवरच ठपका ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या रविवारी (दि. 5) जेएनयू कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना लाठय़ा-काठय़ा आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. यात 35 विद्यार्थी आणि काही प्राध्यापक जखमी झाले होते. दरम्यान, जेएनयूतील वाढीव शुल्क विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) भरेल. ते शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही, असे आश्वासन मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी दिले.

माझ्याकडेही हल्ल्याचे पुरावे आहेत – घोष

मी काही चूक केलेली नाही. उलट तोंडाला मास्क लावलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला तेव्हा हल्ला रोखण्यासाठी मी गेले होते. माझ्यावर हल्ला केला गेला. माझे डोके रक्तबंबाळ झाले. पोलिसांसमोर हा हल्ला झाला. मात्र, पोलिसांनी रोखला नव्हता असे आइशी घोषने म्हटले आहे. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत असेही घोषणे स्पष्टपणे सांगितले.

दिल्ली पोलीस काय म्हणाले…

दिल्लीचे पोलीस उपायुक्त जॉय टिर्क्री यांनी पत्रकार परिषदेत 3 ते 5 जानेवारीपर्यंतच्या घटनाक्रमाची माहिती देऊन हिंसाचार घडवणाऱया नऊ संशयितांची ओळख पटल्याचे सांगितले. या नऊ जणांमध्ये आइशी घोषचा समावेश आहे.

नऊ संशयितांमध्ये सात जण डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनेचे आहेत, तर दोघे उजव्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे आहेत असे पोलिसांनी सांगितले. यावेळी संशयितांची छायाचित्रे जारी केली.

डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी काही विद्यार्थ्यांना परिक्षेचे रजिस्ट्रेशन करण्यापासून रोखले. या विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात होत्या. ‘जेएनयू’मधील हिंसाचार पूर्वनियोजित होता. यासाठी व्हॅट्स ऍप ग्रुपही तयार करण्यात आले होते. तोंडाला फडके बांधून हल्ले करण्यात आले. आतापर्यंत हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले नाही. मात्र, व्हायरल व्हिडीओवरून संशयितांची ओळख पटविली असे पोलीस उपायुक्त टिर्क्री यांनी सांगितले.