कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या रक्षकांच्या वारसांना नोकरी; पालिका सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या सुरक्षा दलातील अधिकारी आणि कर्मचाऱयांसाठी भांडुपमधील सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे टप्प्याटप्याने आधुनिकीकरण केले जाणार असून त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सुरक्षा दलाला दिले. दरम्यान, कोरोना काळात सुरक्षा दलातील मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱयांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाणार असून सुरक्षा रक्षकांची रिक्त पदेही भरली जाणार आहेत, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या सुरक्षा दलाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काकाणी यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेच्या सुरक्षा दलासोबतच मुंबई अग्निशमन दल व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग यांच्यात सातत्याने अधिक प्रभावी समन्वय साधावा, अशी सूचना काकाणी यांनी केली. सुरक्षा दलाच्या विविध ‘प्लाटून’द्वारे कवायती व शस्त्र कवायती सादर करण्यात आल्या. यामध्ये सर्वोत्कृष्ट प्लाटूनचा पुरस्कार ‘प्लाटून क्रमांक 2’ यांना घोषित करण्यात आला. यावेळी उपायुक्त प्रभात रहांगदळे, प्रमुख सुरक्षा अधिकारी (प्रभारी) विलास सुर्वे यांच्यासह पालिकेच्या सुरक्षा विभागातील आजी-माजी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोरोना काळात  सुरक्षा दलाचे मोठे योगदान  

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेली कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. या कामगिरीची जगाने नोंद घेतली आहे. या कामगिरीमध्ये महापालिकेच्या सुरक्षा दलाचेही महत्त्वाचे योगदान होते. महापालिकेने अल्पावधीत उभारलेली जम्बो कोविड उपचार केंद्रे, महापालिकेची विविध रुग्णालये या ठिकाणी महापालिकेच्या सुरक्षा दलाने अत्यंत समयसूचकतेने, संवेदनशीलतेने आणि सुयोग्य प्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळली. ही निश्चितच एक महत्त्वाची आणि कौतुकास्पद कामगिरी आहे, असे गौरवोद्गारही काकाणी यांनी काढले.