जॉर्ज सॅम्पपावली यांनी अर्जेंटिनाचे प्रशिक्षकपद सोडले

26

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये बलाढय़ अर्जेंटिना संघाला बाद फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. या खराब कामगिरीमुळे निराश झालेल्या जॉर्ज सॅम्पपावली यांनी अखेर अर्जेंटिना संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन आणि प्रशिक्षक सॅम्पपावली यांच्यात एकमताने झालेल्या करारानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सॅम्पपावली यांच्या राजीनाम्यामुळे दोन वेळच्या जगज्जेत्या अर्जेंटिनावर गेल्या ४ वर्षांमध्ये चौथा प्रशिक्षक बदलाची नामुष्की ओढवली आहे. वर्षभरापूर्व सॅम्पपावली यांनी अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकपदाचा पदभार सांभाळला होता, मात्र विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे त्यांना लगेचच पदाकरून पायउतार व्हावे लागले आहे. रशियात पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सॅम्पपावली यांच्या रणनीती अर्जेंटिना संघासाठी चांगल्याच मारक ठरल्या. स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेतील टोटॅनहम क्लबचे प्रशिक्षक मॉरिश पॉचिटीनो, अटलॅटीको माद्रिदचे प्रशिक्षक दिएगो सिमॉन्स हे अर्जेंटिनाच्या आगामी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या