पत्रकारांना मिळणार पेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नागपूर

राज्यातील ज्येष्ठ आणि वयोवृद्ध पत्रकारांना ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’च्या माध्यमातून पेन्शन योजना सुरू करण्याच्या सरकारी निर्णयाचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी स्वागत केले आहे. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषद गेली २१ वर्षे सरकारकडे पाठपुरावा करीत होती.

सरकारने पेन्शन योजना २००५ पासून बंद केलेली आहे. शिवाय पत्रकार हे खासगी आस्थापनेकडे काम करीत असल्याने त्यांना सरकारने पेन्शन का द्यावी असे तांत्रिक मुद्दे उपस्थित होत राहिल्याने पत्रकार पेन्शन योजनेची फाईल गेली अनेक वर्षे धूळ खात पडलेली होती. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातही पत्रकारांना पेन्शन देण्याचे अभिवचन देण्यात आले होते. तरीही शासकीय पातळीवर याबाबत उदासीनता होती. याविरोधात मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकार सातत्याने आंदोलने करीत होते. या लढय़ास अखेर यश आले असून सरकारने आज सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये पत्रकारांच्या पेन्शनसाठी १५ कोटींची तरतूद केली आहे. किमान दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी, अधिस्वीकृतीची अट असू नये अशी मागणी देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

– पत्रकार संघाने केले योजनेचे स्वागत
नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर आणि महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी पत्रकार पेन्शन योजनेचे स्वागत केले. अनेक वर्षांपासूनची पत्रकार संघटनांची मागणी अखेर मान्य झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.