बलात्कारपीडितेला विचारला विचित्र प्रश्न, न्यायाधीशाला दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

एका बलात्कारपीडितेला त्या भयंकर प्रसंगानंतरही इतर अनेक क्लिष्ट आणि त्रासदायक बाबींमधून जायला लागतं. तिच्याप्रति जास्तीत जास्त सहानुभूती दाखवण्याची जबाबदारी कायदेशीर यंत्रणांची असते. पण, जर कायदेशीर यंत्रणाच असंवेदनशील वागू लागल्या तर मात्र त्याचा पीडितेला प्रचंड त्रास होतो. अशाच एका विचित्र प्रश्नासाठी एका न्यायाधीशाला दंड ठोठावण्यात आला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये ही घटना घडली. जॉन रूसो असं या न्यायाधीशाचं नाव आहे. साउदर्न न्यू जर्सी येथील न्यायालयात रूसो न्यायाधीश म्हणून रुजू आहे. 2016मध्ये रूसोसमोर एक बलात्काराचा खटला दाखल झाला होता. त्या खटल्यातील पीडितेची उलटतपासणी सुरू असताना रूसोने तिला काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नामधला एक प्रश्न विचित्र होता. ‘बलात्कार रोखण्यासाठी तू तुझे पाय बंद करून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस का?’ हा तो विचित्र प्रश्न होता.

तो प्रश्न म्हणजे पीडितेच्या दुःखावर डागण्या देण्यासारखा प्रकार होता. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल तेथील न्यायसमितीने घेतली. या प्रकरणी बलात्कार पीडितेचा अपमान केल्याचा ठपका ठेवत रूसोला तीन महिने बिनावेतन काम करण्याचा दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणी एका समितीने रूसोच्या प्रश्नाचा लेखाजोखा तेथील उच्चस्तरीय न्यायालयात सादर केला. या अहवालात रूसोने अशा प्रकारचा प्रश्न विचारणं म्हणजे फक्त असभ्यपणा नसून त्याहीपेक्षा जास्त पीडितेसोबत मर्यादाहीन वर्तन होतं. त्यामुळे त्याला हा दंड ठोठावला गेला आहे.