
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रवासादरम्यान कारमधील तरुणांचे रिक्षाचालकासोबत भांडण झाले. त्यावेळी मध्यस्थी केली म्हणून रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका वकिलाच्या मुलीला शिवीगाळ करून त्या तरुणांनी पळ काढला. याप्रकरणी तरुणीने तक्रार देताच जुहू पोलिसांनी दोन तासांत तिघा तरुणांना पकडून आणले.
जान्हवी (नाव बदललेले) ही तरुणी रिक्षातून प्रवास करीत होती. रिक्षा जेव्हीपीडी सर्पलजवळ आली असता बुलेरो कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांचे रिक्षा चालकाशी तू तू-मै मे झाले. तेव्हा जान्हवीने मध्यस्थी केली असता कारमधील तरुणांनी तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पळ काढला. तिने याबाबत पोलिसांत तक्रार दिली. मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक वीरेंद्र भोसले, बिराजदार व पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे त्या कारचा नंबर मिळवला. मग त्यानंतर कारच्या मालकाला गाठले. पण मूळ मालकाने ती कार दुसऱ्या एकाला विकली होती. मग वाव्हळ व त्यांच्या पथकाने दुसऱ्या मालकाला गाठून जान्हवीला शिवीगाळ करणाऱ्या तिघा तरुणांना पकडले.
























































