अरण्यवाचन…सौंदर्याचा सोहळा!

71

अनंत सोनवणे,[email protected]

फराळ, फटाके, भेटवस्तू घेऊन आपण दिवाळी नेहमीच साजरी करतो… यंदा निसर्गात… देखण्या पक्ष्यांसोबत दिवाळी साजरी करून पाहा…

हिवाळय़ाची चाहूल लागली की पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांची लगबग सुरू होते. यावेळी कोणत्या पक्षी अधिवासाला भेट द्यायची, तिथं काय पाहायचं, कोणता कॅमेरा, लेन्स, दुर्बीण सोबत न्यायची वगैरे तयारी सुरू होते. कारण हिवाळय़ाबरोबर सुरू होतो बर्ड वॉचिंगचा सिझन – पक्षी निरीक्षणाचा ऋतू! या ऋतूत जगाच्या कानाकोपऱयातून हिंदुस्थानी उपखंडाकडे पक्ष्यांचं स्थलांतर होतं. तिथल्या कडाक्याच्या हिवाळय़ापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे पक्षी थव्याथव्याने इथे येतात. काही हिंदुस्थानी पक्षीही उत्तरेकडून दक्षिणेकडे देशांतर्गत स्थलांतर करतात. अनेक प्रजातींचे पक्षी एकत्र पाहण्याचा हा सुवर्णयोग साधण्यासाठीच पक्षीप्रेमी व छायाचित्रकारांची धावपळ सुरू असते आणि त्यांच्या आकर्षणाचं प्रमुख स्थळ असतं – भरतपूर पक्षी अभयारण्य.

राजस्थानमधील अवघं 29 चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेलं हे अतिसुंदर पक्षी अभयारण्य. पूर्वी भरतपूर आणि आता केवलादेव राष्ट्रीय उद्यान नावाने ओळखलं जाणारं हे अभयारण्य पक्ष्यांचं नंदनवन मानलं जातं. 1850 च्या काळात हा परिसर भरतपूरचे महाराजआणि ब्रिटिश व्हाईसरॉय यांच्यासाठी राखीव शिकारीचे ठिकाण होतं. 1938 मध्ये तेव्हाचे हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो यांनी इथे एकाच वेळी एकूण 4,273 पक्ष्यांची शिकार केल्याची नोंद आहे. पुढे शिकारीवर बंदी आली, अभयारण्याची निर्मिती झाली आणि पक्ष्यांना अभय मिळालं. आज जगातल्या सर्वांत उत्कृष्ट पक्षी अभयारण्यांमध्ये त्याची गणना होते. जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही भरतपूर अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे.

arnya-24

भरतपूरला त्याचा हा नावलौकिक मिळवून दिला आहे आपल्या किलबिलाटाने आसमंत दणाणून सोडणाऱया इथल्या हजारो सुंदर पक्ष्यांनी. इथे 350 हून अधिक प्रजातींचे पक्षी सुखाने नांदतात. त्यातले काही स्थानिक तर काही स्थलांतरित असतात. हिंदुस्थानी संस्कृतीत प्रेमाचे प्रतीक मानला गेलेला क्रौंच पक्षी इथे पाहायला मिळतो. या प्रजातीत नर आणि मादीची जोडी आयुष्यभर एकत्र राहते. परतपूरमध्ये सारस क्रौंचच्या जोडय़ा पाहताना मन आनंदून जातं. सायबेरीयन क्रौंच हा अतिदुर्मिळ पक्षी सायबेरीयातून भरतपूरला येतो. दुर्दैवाने हा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय इथे पेलिकन्स, विविध प्रकारची बदकं, गिधाडं, ग्रेटर स्पॉटेड ईगल, ईस्टर्न इंपीरिअल ईगल, मार्बल्ड टील, बैकल टील इत्यादी पक्ष्यांचे मनसोक्त निरीक्षण करता येतं. हे अभयारण्य प्रमुख्यानं पक्ष्यांचं असलं तरी इथे चितळ, लांडगा, तरस, सांबर,नीलगाय, रानडुक्कर हे सस्तन वन्य जीवही वास्तव्य करतात.

अगदी सकाळीच किंवा संध्याकाळी पक्षी निरीक्षणासाठी जंगलात जाणं योग्य ठरतं. रिक्षा किंवा सायकलने इथे मनसोक्त भटकंती करता येते. अनेक प्रजातींचे पक्षी एकाच ठिकाणी पाहता येतात. विविध प्रकराचे हंस, पिपीट, शांक, स्टीन्ट, नाचण, लार्क वगैरे पाहताना पक्षीप्रेमी मंत्रमुग्ध होतात. भरतपूर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी वर्षभर खुलं असतं. स्थानिक पक्षी पाहायचे असतील तर ऑगस्ट ते नोव्हेंबर हा इथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे. मात्र स्थलांतरित पक्ष्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वाधिक योग्य हंगाम ठरतो. विशेष म्हणजे इथले रिक्षाचालकसुद्धा अत्यंत प्रेमाने तुम्हाला पक्ष्यांविषयी माहिती पुरवतात.

भरतपूर अभयारण्याचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हे नंदनवन मानवनिर्मित आहे. वर्षानुवर्षे येणाऱया पुरापासून भरतपूर शहराचं रक्षण करण्यासाठी 1760 साली एक मातीचा बंधारा बांधण्यात आला. दरवर्षी ध्वनी आणि वायू प्रदूषणात दिवानी साजरी करणाऱया  शहरी नागरिकांनी यावर्षीची दिवाळी कुटुंबीयांसह भरतपूरला निसर्गाच्या आणि पक्ष्यांच्या सहवासात साजरी  करायला काय हरकत आहे?

भरतपूर पक्षी अभयारण्य

प्रमुख आकर्षण…स्थानिक व स्थलांतरित पक्षी

जिल्हा…भरतपूर

राज्य…राजस्थान

क्षेत्रफळ…29 चौ.कि.मी.

निर्मिती…1971

जवळचे रेल्वे स्थानक…भरतपूर जंक्शन (5 कि.मी.)

जवळचा विमानतळ…जयपूर (185 कि.मी.)

निवास व्यवस्था…अनेक खासगी हॉटेल्स व रिसॉर्टस्

योग्य हंगाम…ऑगस्ट-नोव्हेंबर, ऑक्टोबर-फेब्रुवारी

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टी…नाही

 

 

आपली प्रतिक्रिया द्या