
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांची मध्य प्रदेशच्या मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस करण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती एस. के. सेथ लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजिअमने न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. यापूर्वी अकिल कुरेशी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे.
1983 साली कुरेशी यांनी वकिली करण्यास सुरुवात केली.1992 ते 1998 दरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या अतिरिक्त काऊन्सिल म्हणून काम पाहिले अहमदाबाद येथे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रीबुनलसाठीही त्यांनी काम केले. गुन्हे, जमीन अधिग्रहण, पासपोर्ट यासंदर्भातील अनेक याचिकांवर त्यांनी आदेश दिले.
गुजरात हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून 2004 साली नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 12 ऑगस्ट 2005 साली त्यांना न्यायमूर्ती म्हणून कायम करण्यात आले. 2 नोव्हेंबर 2018 साली त्यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून गुजरात हायकोर्टात नेमण्यात आले. नेमणुकीच्या 12 दिवसांनंतरच त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली.





























































