
वृद्ध नागरिकांना लक्ष्य करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या बालगुन्हेगार टोळीने डोंबिवलीत धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या तीन अन्य साथीदारांना गजाआड केले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकलीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मोठागाव, देवीचापाडा आणि कुंभारखानपाडा परिसरात अल्पवयीन मुलांच्या टोळीचा विष्णूनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
डोंबिवली पश्चिम काळूबाई मंदिर परिसरात राहणारे सुगंध म्हात्रे (६४) यांच्यावर २४ मे रोजी सकाळी देवीचापाडा परिसरात हल्ला करून त्यांची सुमारे सवा लाख रुपयांची सोन्याची चेन लुटण्यात आली होती. आरोपींनी म्हात्रे यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांना जखमी केले आणि चेन हिसकावून दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेनंतर विष्णूनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या प्रकरणाचा छडा लावत टोळीतील सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचे साथीदार चिंतन नंदा (२०), मोहित जाधव (१९) आणि स्वप्नील भोईर (२७) यांना अटक करून कल्याण न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अल्पवयीन सहा आरोपींना भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. चोरी केलेले सोन्याचे दागिने आरोपी स्वप्नील भोईर याच्या माध्यमातून विकले जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.



























































