विकासाच्या पाऊलखुणा : स्त्री प्रतिनिधित्व

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

देशाचे वय फक्त 53 वर्षांचे… लोकसंख्या जेमतेम 67 लाख. देशाचा विकास आणि प्रगती ढोबळमानाने कशाने मोजावी? तर त्या-त्या देशातल्या महिलांच्या प्रगतीवर त्या देशाचा विकास ठरत असावा. ज्या अनेक देशांमध्ये 1980 पर्यंत महिलांना मतदानाचा हक्कही नव्हता अशा देशांमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर, राजकीय पदांवर महिला विराजमान झालेल्या दिसतात. अशा देशांची प्रगती त्या देशांचे प्रतिनिधित्वच बोलत असते. ज्या देशाबद्दल आज आपण माहिती घेतोय तो आहे पश्चिम आफ्रिकेतला छोटासा देश टोगोलीस रिपब्लिक, अर्थात टोगो हा देश. या देशाच्या पहिल्या पंतप्रधान व्हिक्टोयर टोमेगाह डॉग्बे यांच्याविषयी…

टोगो हा देश विविध वसाहतींचा अड्डा होता. मुख्यत युरोपीय देश टोगोवर नजर ठेवून होते. आफ्रिकन देश म्हणजे गुलामांचा देश आणि टोगोचे नाव तर ‘द स्लेव्ह कोस्ट’ असेच होते. अठराव्या शतकापासून किंवा सोळाव्या शतकापासून टोगो या देशावर युरोपातील विविध राजवटींनी राज्य केले. या दे-शातून लोक आणून त्यांना गुलाम म्हणून राबवण्यात आले. टोगो हा गुलामांचा देश म्हणून प्रसिद्ध होता. 1960 मध्ये स्वतंत्र झाला. त्या वेळी हा देश फ्रेंच लोकांची वसाहत होता. दीर्घकाळ फ्रान्सने टोगोवर राज्य केले. या देशाची मुख्य भाषा फ्रेंच आहे. मात्र 2020 नंतर देशाचं भवितव्य पालटले. 2020 मध्ये देशाच्या तेराव्या पंतप्रधानांची नियुक्ती झाली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला पंतप्रधानांनी देशाचा कारभार सांभाळला. सप्टेंबर 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष फौरे ग्नासिंगबे यांनी टोगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून व्हिक्टोयर टोमेगाह डॉग्बे यांची नियुक्ती केली. पूर्वपंतप्रधान कोमी सेलम कला-सौ यांच्या राजीनाम्यानंतर ते पद रिक्त झाले होते. एका अत्यंत मागास देशाची सूत्रे एका स्त्राrच्या हाती जाणीवपूर्वक सोपवणे या त्या देशाच्या विकासाच्या पाऊलखुणा आहेत. देशाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे ते लक्षण मानण्यात येत आहे.

व्हिक्टोयर टोमेगाह डॉग्बे (जन्म 23 डिसेंबर 1959) या टोगेसी राजकर्ती स्त्राrने 28 सप्टेंबर 2020 मध्ये पंतप्रधानपदाचा पदभार सांभाळला आहे. डॉग्बे या 2008 पासूनच राजकारणामध्ये साक्रिय आहेत. 2008 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या विकासात्मक कार्पामाच्या संचालक म्हणून बेनीन यांची देशात त्यांची नियुक्ती होती. राष्ट्राध्यक्ष फौरे ग्नासिंगबे यांनी त्यांना मंत्रालयाचा कारभार बघण्यासाठी आणि मंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्यासाठी आमंत्रित केले. 2010 मध्ये मागासलेल्या लोकांचा विकासात्मक कार्पाम, युवा कारागीर आणि युवा रोजगार खात्याच्या मंत्री म्हणून खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. 2012-13 च्या सरकारमध्ये तसेच 2013-15च्या सरकारमध्येही त्यांच्याकडे मंत्रालय कायम राहिले. आतापर्यंत डॉग्बे यांनी तीन पंतप्रधानांच्या सरकारमध्ये युवा कारागीर, युवा रोजगार आणि मागासलेल्या लोकांच्या विकासात्मक मंत्रालयाचे काम पाहिले.

आफ्रिकेमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाचे चित्र गेल्या पाच वर्षांमध्ये बदलत आहे. अनेक छोटय़ा छोटय़ा देशांचा कारभार महिलांच्या हातात आलेला आहे. टोगो देशाचे पंतप्रधानपदही महिलेच्या हातात आले.
डॉग्बे यांनी मंत्रालय सांभाळतानाच मंत्रालयाच्या संरचनेमध्ये आमूलाग्र बदल केला. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले. एकंदरच त्यांना दिलेले पंतप्रधानपद हे केवळ त्यांच्या एकटीचे नसून देशातील समस्त स्त्री वर्गाचा, त्यांच्या विकासाचा आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.

आर्थिक दुर्बलता, शिक्षणाची वाणवा, विकास नसलेल्या टोगो देशाची आज मात्र प्रतिमा बदलत आहे. झपाटय़ाने प्रगती करणारा आफ्रिकन देश म्हणून टोगोचे नाव प्रामुख्याने येते. हा मुख्यत कृषिप्रधान देश आहे, आर्थिक उत्पन्नाचे साधन फारच कमी आहे. मात्र फ्रान्सच्या सर्व प्रकारच्या प्रभावांपासून मुक्त होण्यासाठी हा देश सातत्याने प्रयत्न करत आहे. युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियन, संयुक्त राष्ट्रे यांच्या मदतीने देश प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे.

अध्यक्षपदाच्या वादामुळे टोगो देशावर आंतरराष्ट्रीय निर्बंध आलेले होते. साहजिकच प्रगतीचे सगळे मार्ग बंद झालेले होते. डॉग्बे यांनी कार्यभार स्वीकारताच आपल्या आंतरराष्ट्रीय वैयक्तिक संबंधांना राजकीय स्वरूप दिले. देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी युरोपियन आणि आफ्रिकन युनियन यांची मदत मागितली. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनीही रोजगारी, शिक्षण, विकासात्मक कार्यासाठी मदत करण्याचे मान्य केले.

स्वातंत्र्यापासूनच देशाची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती, गेल्या काही वर्षांत तर विकासाचा वेग आणखीनच मंदावला. त्यामुळे डॉग्बे यांच्या समोर देशाला आर्थिक विपन्नतेच्या खाईतून बाहेर काढण्याचे मोठेच आव्हान होते. टोगो देशामध्ये डॉग्बे यांचा यशस्वी विकासात्मक कार्पामांचे, गरिबी हटाव मोहिमांचे, युवा बेरोजगारीवर तोडगा शोधण्याच्या कामांमुळे सन्मान झाला. त्याचमुळे पंतप्रधानपद त्यांच्याकडे सोपवल्यानंतर देशातील जनतेच्या मनात एक आशावाद निर्माण झाला. सध्या तरी दारिद्रय़ रेषेखालील लोकांची संख्या अर्ध्यावर आणण्याचे त्यांचे ध्येय आहे आणि येत्या काळात हे ध्येय त्या निश्चितच पूर्ण करतील.

सर्वच दृष्टीने मागासलेल्या एकेकाळी गुलाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या टोगोसारख्या देशामध्ये राजकारणामध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचे भवितव्य नव्हते. मात्र आज ही परिस्थिती बदलली आहे असे तेथील स्त्राrवादी नेत्या म्हणतात. मुलींना त्यांच्या अधिकाराचे शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिला चळवळीला वेग आलेला आहे. महिला आणि मुलींना मोठी स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे हेच डॉग्बे यांच्या नियुक्तीने सिद्ध केले. टोगो देशामध्ये महिलांच्या उत्थापनाचे दिवस आले आहेत. महिला हक्क संरक्षणच्या नेत्या एल्सा बकोले म्हणतात, “डॉग्बे म्हणजे आमच्यासाठी एक आशावाद आहे.” लिंग समानतेबद्दल बोलूनच हा देश थांबला नाही, तर हळूहळू त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेत आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. त्यांच्या नियुक्तीने संपूर्ण आफ्रिका आणि युरोप खंडातील महिला व मुलींना एक प्रेरणा आणि नवा आशावाद मिळाला आहे.

[email protected]

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)