कास पठारावर भीषण आग, अनेक एकरांवरील जैव विविधता जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सातारा

युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेले आणि साताऱ्याला आपल्या वैविध्यपूर्ण फुलांच्या माध्यमातून वेगळी ओळख देणाऱ्या कास पठाराला गुरुवार दि. 9 रोजी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत अनेक एकरांवरील जैवविविधता जळून खाक झाली असून यामध्ये अनेक सरपटणारे प्राणी तसेच पक्षीही मृत झाले आहेत. मात्र, या कास पठाराची देखभालीची जबाबदारी असलेल्या कास संयुक्त वन व्यवस्थापन समिती मात्र फक्त पैसे गोळा करायलाच आहे काय, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

सातार्या पासून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कास पठाराला गुरुवार दि. 9 रोजी मध्यरात्री भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की काही क्षणातच आग पठारावर पसरली. यावेळी अनेक एकरांवरील परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. छोटे-मोठे वृक्षही आगीने जळून खाक झाले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचे नुकसान झाले आहे. दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कास पठारावरील सुमारे 280 फुलांच्या प्रजाती, वनस्पती, वेलींना बहर येतो. हिंदुस्थानसह जगभरातील लोक या आगळ्यावेगळ्या पुष्प पठाराला आवर्जून भेट देतात. त्यामुळे कास पठार हे सातारा जिल्ह्यातील नवीन हॉलिडे डेस्टिनेशन झाले आहे. काही वर्षांपूर्वी वन विभागाने पुढाकार घेऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, तसेच कास पठारावरील जैव विविधतेचे संरक्षण व्हावे, म्हणून संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना केली होती. मात्र पैसे गोळा करण्याच्या नादात आपले कर्तव्य विसरलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या ढिसाळ कारभारामुळे कास पठारावरील यंत्रणा कोलमडलेली आहे.

गुरुवार दि. 9 रोजी रात्री कास पठारावर आग लागल्यानंतर कास व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक आग विझवण्यापेक्षा गप्पा मारण्यात व्यग्र होते, तर काहीजण कास पठारावर असलेल्या चौकीमध्ये झोपा काढत होते. कास पठारावरून बामणोलीकडे जाणाऱ्या लोकांना पठारावरील आग निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ याबाबत वन विभागाला माहिती दिली. मात्र सकाळपर्यंत कास पठारावर कोणीच फिरकले नसल्यामुळे कास पठारावरील जैव विविधता आगीत मोठ्या प्रमाणावर भस्मसात झाली आहे. दरवर्षी कास पठारावरील फुलांच्या हंगामामध्ये कास संयुक्त वन व्यवस्थापन समिती कोट्यवधी रुपये गोळा करते. तसेच कास पठारावरील पेट्रोलिंगसाठी वन विभागाने समितीला चारचाकी वाहनेही दिली आहेत. मात्र याचा वापर भलत्याच ठिकाणी केला जात असल्याची चर्चा आहे. कास पठारावर उन्हाळ्यात वणवे लागतात. ते विझवण्यासाठी वन विभागाकडे तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. मात्र वन विभाग व समिती वेगळ्या ठिकाणी गोळा झालेल्या निधीचा वापर करीत असल्याने कास पठाराची दुर्दशा झाली आहे.