‘काळम्मवाडी’तून मे 2022 अखेर कोल्हापूरकरांना मुबलक पाणीपुरवठा, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर शहरातील जनतेला शुद्ध, मुबलक आणि थेट पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने काळम्मवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती. काही तांत्रिक आणि वन विभागाच्या जाचक नियमांमुळे या योजनेला विलंब झाला. मात्र, मे 2022 अखेर कोल्हापूरकरांना या योजनेचे पाणी उपलब्ध होईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे काळम्मवाडी थेट पाइपलाइनसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपस्थित होते. हर्षजित घाटगे यांनी सादरीकरण केले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, शहराला थेट पाणीपुरवठा करणाऱया पाइपलाइनचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल. सुमारे 450 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली असून, या कामाकरिता निधीची अजिबात कमतरता जाणवणार नाही. जॅकवेलचे काम प्राधान्याने करण्यात यावे, अशा सूचना ठेकेदाराला देत मुश्रीफ यांनी 2022 साली येणारी दीपावली तमाम कोल्हापूरवासीयांच्या जीवनात आनंद निर्माण करेल, असा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर 2021 च्या दीपावली सणामध्ये आपण कोल्हापूरकरांना पाणी देण्याचा शब्द पूर्ण करू शकलो नसल्याबद्दल त्यांनी शहरवासीयांची क्षमा मागितली. लवकरच ठेकेदार आणि या योजनेच्या मुख्य सल्लागारांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

पाइपलाइनचे केवळ तीन किलोमीटरचे काम अपूर्ण

काळम्मवाडी थेट पाइपलाइन योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे 95 टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. तसेच, शहराला पाणीपुरवठा करणाऱया पाइपलाइनचे केवळ तीन किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. योजना पूर्णत्वाच्या विलंबामुळे ठेकेदाराला आतापर्यंत सुमारे 5 कोटी 30 लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दिली.