कळमनुरीत शिवसेनेच्यावतीने गोरगरिबांना 101 क्विंटल धान्य वाटप

कोरोना संसर्गजन्य विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक डाऊन व संचार बंदीमुळे रोजमजुरी करून गुजराण करणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र, गोरगरिबांच्या मदतीला शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर धावून गेले आहेत. शिवसेना आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरी शहर आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील हातावर पोट असणाऱ्या व मजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गोरगरिबांसाठी 101 क्विंटल जीवनावश्यक अन्नधान्य उपलब्ध केले आहे. यामध्ये तांदूळ, साखर, रवा, पीठ, गोडे तेल या वस्तुंचा समावेश आहे.

कळमनुरी शहर व परिसरात शिवसैनिकांकडून गोरगरिबांना या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी शहरात रोज मजुरी करणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वितरण केले. यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख व आमदार संतोष बांगर म्हणाले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गोरगरिबांची अडचण सोडविण्याची शिकवण आम्हाला दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राची काळजी घेत आहेत. सरकारच्या पातळीवर शिवसेनेचे प्रयत्न सुरू असताना पक्ष संघटनेच्या माध्यमातूनही शिवसेना नेहमी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहील.

माझ्या कळमनुरी मतदारसंघातील गोरगरीब बांधवांच्या चेहऱ्यावरची काळजी कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे काम करतो आहे. मतदारसंघातील कुठल्याही बांधवांनी काळजी करण्याची काही गरज नाही. हा तुमचा आमदार व शिवसेना प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे, कळमनुरी शहराचे नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक राम कदम, नगरपालिकेचे गटनेते आप्पाराव शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष सारडा, नगरसेवक दादाराव डुरे, अतुल बुर्से, संभाजी सोनुने, सुहास बेद्रे पाटील, बाळु पारवे, बबलू पत्की, रवी शिंदे, गुलाब जाधव, उदय लाला, आर. आर. पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या