
कर्नाटकची आकांक्षा पुराणिक, वय वर्षे 17. हार्मोनियम, तबला, कीबोर्ड, सितार, गिटार, ढोलकी अशी सगळी वाद्ये वाजवते. ती हिंदी, तेलगू, कन्नड आणि मराठी भाषांमध्ये गाऊ शकते. ती भरतनाटय़ सादर करून मनं जिंकते, त्याच वेळी कराटे आणि किक बॉक्सिंगचा जलवा दाखवते. हरहुन्नरी आकांक्षाची चर्चा तर होणारच.
कलबुर्गी येथे राहणारी आकांक्षा पुराणिक 60 हून अधिक कलांमध्ये पारंगत आहे. या सर्व कला स्पर्धांमध्ये तिने पुरस्कार पटकावले आहेत. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱया आकांक्षाने 300 ट्रॉफी आणि 600 प्रमाणपत्रे मिळवली आहेत. अलीकडेच सितार वादनाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावले. कराटेमध्ये तिने ब्लॅक बेल्टही मिळवले आहे.
आकांक्षाला काही भाषा अवगत आहेत. ती हिंदी, तेलगू, कन्नड आणि मराठी गाणी गाते. तिचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे. ती चांगली चित्रे काढते. रांगोळी आणि मेहंदीचे डिझाईन साकारते. प्रमोद आणि रूपाली पुराणिक हे आकांक्षाचे आईबाबा. प्रमोद पुराणिक हे डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन आहेत, तर रूपाली शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी आकांक्षाचे संगोपन करण्यासाठी नोकरी सोडली.
n वयाच्या पाचव्या वर्षी आकांक्षाने संगीत शिकायला सुरुवात केली. तेव्हापासूनच ती सगळ्या कला हळूहळू शिकू लागली. विविध कला शिकताना तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. तिने दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवले.
























































