कालिना कॅम्पसला झोपड्यांचा विळखा, मुंबई विद्यापीठाचे दुर्लक्ष; आणखी एका एसआरए प्रकल्पाची धास्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसला अनधिकृत झोपड्यांचा विळखा बसला आहे. 50 हून अधिक झोपड्यांतून विद्यापीठाच्या आवारात गवत कापण्यासाठी रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी राहत आहेत. या झोपड्यांमध्ये मोफत वीज व पाणीपुरवठा केला जात असून विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यापीठात आणखी एक एसआरए प्रकल्प उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्यांनी कालिना कॅम्पस येथील हयात प्रवेशद्वाराशेजारील क्रिकेट मैदानालगत असलेल्या झोपडपट्टीची नुकतीच पाहणी केली. या झोपड्यांमुळे विद्यापीठाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून येथे त्या तातडीने निष्कासित करण्यात याव्यात अशी मागणी युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि शीतल शेठ-देवरुखकर यांनी कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली.

कालिना कॅम्पसमधील आंबेडकर भवनाच्या अगदी समोर या झोपड्या उभ्या आहेत. तरीदेखील त्याकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष झाले आहे. विद्यापीठात केंद्रीय तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी नुकत्याच भेटी दिल्या असून यापुढेही वारंवार त्यांच्या भेटी अपेक्षित आहेत. तरी विद्यापीठ प्रशासनाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या सहकार्याने सदर झोपडपट्टी ताबडतोब हटवून येथील रोजंदारी कर्मचाऱ्यांची अन्यत्र निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणीही युवासेना माजी सिनेट सदस्यांनी केली आहे.