मुंबईला वीज पुरवठा करणारी कळवा-तळेगाव वीजवाहिनी पूर्ववत!

मुंबईला वीज पुरवठा करणाऱया चार प्रमुख वीज वाहिन्यांपैकी एक असलेल्या कळवा-तळेगाव या 400 केव्ही वीज वहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. डोंगर-दऱयांच्या दुर्गम भागातून गेलेल्या या वीजवाहिनीचे तुटलेले कंडक्टर बदलण्याचे काम महापारेषणच्या 100 अधिकारी, कर्मचाऱयांनी चार दिवसात पूर्ण केले आहे. त्यामुळे मुंबईला अखंडित वीज पुरवठा होऊ शकणार आहे.

मुंबईची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी जवळपास 2000 मेगावॅट वीज मुंबई परिसरातील टाटा पॉवर आणि अदानीच्या वीज केंद्रातून घेतली जाते, तर उर्वरित वीज राज्यभरातून आणली जाते. त्यासाठी महापारेषणने कळवा-पडघा सर्किट 1 व 2, कळवा-खारघर आणि कळवा-तळेगाव या 400 केव्हीच्या चार वीज वाहिन्या उभारल्या आहेत. 10 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील कानीफाटा-दहिवली दरम्यानच्या 400 केव्हीच्या कळवा-तळेगाव वीज वाहिनीचे कंडक्टर फेल झाली.  12 ऑक्टोबर रोजी कळवा-पडघा सर्पिट  1 आणि 2 मध्ये झालेला बिघाड आणि कळवा-खारघर वहिनीच्या खारघर उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र महापारेषणने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत तिन्ही वाहिन्या पूर्ववत केल्या होत्या. परंतु कळवा-तळेगाव वाहिनीचा बिघाड दुर्गम भागात झाला होता. तसेच वीज वाहिनीचा एक टॉवर डोंगर माथ्यावर तर दुसरा टॉवर खोल दरीत होता. त्यामुळे गेले चार दिवस येथे 12 अभियंते आणि 80 कामगारांनी अविश्रांत मेहनत घेत कानीफाटा-दहिवली दरम्यानच्या वीज वाहिनीचे कंडक्टर बदलले आहेत. त्यामुळे मुंबईला वीज पुरवठा करणारी चौथी वीज वहिनी पूर्ववत झाल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्विटवरुन सांगितले.

उर्जामंत्र्यांकडून वीज कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप

मुंबईला वीज पुरवठा करणाऱया कळवा-तळेगाव वीज वाहिनीचा लोणावळ्याच्या अतिदुर्गम खोल दरीच्या ठिकाणी तुटलेला कंडक्टर दुरुस्त करण्यासाठी महापारेषणच्या वीज कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून दुरुस्तीची मोहीम फत्ते केली.  कामगार चक्क वीज वाहिनीवर लटकून काम करत असल्याचा व्हिडिओ ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्विट करत सलाम तुमच्या कामगिरीला अशा भावना व्यक्त केल्या आहेत. वीज कामगारांच्या या धाडसी कामगिरीची उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दखल घेतली आहे. वीज वाहिनीवर लटकून काम करणाऱया वीज कामगाराचा व्हिडीओ महिंद्रा यांनी रिट्विट केला आहे. तसेच उंचावर काम करणाऱया या कामगारांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असेही म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या