
सामना ऑनलाईन । मुंबई
गेली 48 तास पावसाने मुंबईसह महाराष्ट्राला झोडपले आहे. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल शनिवार आणि रविवारी असे सलग दोन दिवस अनेक तास ठप्प होती. म्हणून रेल्वे प्रशासनाने सोमवारी कल्याण- बदलापूर आणि कसारा रेल्वेसेवा पावसाची स्थिती पाहून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा मुंबई ते कल्याण, पश्चिम रेल्वेवरील मुंबई ते गोरेगाव तसेच हार्बर मार्गावरील मुंबई ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल या सेवा सुरू राहणार आहेत.
तर कल्याण ते बदलापूर, कल्याण ते कसारा या मार्गाची रेल्वे सेवा उद्या पावसाच्या स्थिती पाहून सुरू करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वेखाली खडी वाहून गेली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. शनिवारी पावसामुळे रेल्वेसेवा 5 तास ठप्प होती. त्यामुळे दोन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आले. परंतु रात्रभर जोरदार पावसामुळे पुन्हा काही तास रेल्वे सेवा ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांनी बाहेर पडताना ही बाब लक्षात घेऊन बाहेर पडावे असे आवाहन रेल्वेने केले आहे.



























































