
कल्याणमधील नांदिवली येथे मराठी रिसेप्शनिस्टला अमानुष मारहाण करणारा गोकुळ झा हा पोलिसांना चकमा देण्यासाठी लूक बदलून फिरत होता. त्याने घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर त्याने केस बारीक कापले, शर्ट बदलून त्याने ओव्हर साईज टी शर्ट घातला. व्हिडीओतला शर्टमध्ये दिसणारा गोकुळ झा आणि ओव्हर साईज टीशर्ट घातलेला गोकुळा यात बऱ्यापैकी फरक दिसत होता.
सोमवारी संध्याकाळी कल्याणमध्ये परप्रांतीय तरुणाने रुग्णालयातील मराठी स्वागतिकेवर जीवघेणा हल्ला केला. नांदिवलीतील श्री बाल चिकित्सालय येथे रुग्ण महिलेसोबत आलेल्या गोकुळ झा याने डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिसेप्शनिस्ट सोनाली कळासरे हिने डॉक्टर बिझी आहेत, पाच मिनिटे थांबा, असे सांगताच त्याचा राग अनावर झाला. काही कळायच्या आतच मुजोर गोकुळने धिंगाणा घालत तरुणीच्या पोटात लाथा घालत अमानुष मारहाण केली. तिचे केस पकडून खाली आपटून विनयभंग केला.