कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरण : आरोपी गोकुळ झा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कल्याणमधील नांदिवली येथे रिसेप्शनिस्टला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या गोकुळ झा याला कल्याण सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गोकुळ सोबत पोलिसांनी त्याच्या भावाला देखील अटक केली आहे.

भाईंदरमधील परप्रांतीयांच्या मुजोरीचे प्रकरण ताजे असतानाच आज कल्याणमध्ये परप्रांतीय तरुणाने रुग्णालयातील मराठी स्वागतिकेवर जीवघेणा हल्ला केला. नांदिवलीतील श्री बाल चिकित्सालय येथे रुग्ण महिलेसोबत आलेल्या गोकुळ झा याने डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिसेप्शनिस्ट सोनाली कळासरे हिने डॉक्टर बिझी आहेत, पाच मिनिटे थांबा, असे सांगताच त्याचा राग अनावर झाला. काही कळायच्या आतच मुजोर गोकुळने धिंगाणा घालत तरुणीच्या पोटात लाथा घालत अमानुष मारहाण केली. तिचे केस पकडून खाली आपटून विनयभंग केला.