पेढीच्या स्तुतीला सराफ भुलला; 55 हजारांच्या चेनला मुकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कल्याण

सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाला बोलण्यात गुंतवून महिलेने 55 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे चोरटय़ा महिलेसह त्याच्या दोन साथीदारांनी शंकलेशा शेठ, अशी पेढी कल्याणमध्ये शोधूनही सापडणार नाही अशी स्तुती केली आणि या स्तुतीला भुलून सराफ आणि कर्मचाऱयांनी वस्तू दाखवताना हलगर्जीपणा दाखवला. नेमकी हीच संधी साधून महिलेने चलाखीने चेन लांबवली.

कमलेश शंकलेशा यांचे मोहम्मद अली चौकात प्रताप ज्वेलर्स नावाने दुकान आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात महिला कडेवर एका लहान मुलाला घेऊन दोन अज्ञात इसमांसह दुकानात आली. त्यांनी सोन्याची चेन दाखवण्यास सांगितले. चेन बघण्याचा बहाणा करत त्यांनी सराफ आणि कर्मचाऱयांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने 55 हजार रुपये किमतीची चेन घेऊन पळ काढला. काही वेळानंतर शंकलेशा यांना चेन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस चोरटय़ांचा शोध घेत आहेत.