
वारंवार नोटिसा बजावूनही बिले न भरणाऱ्या फुकट्या वीज ग्राहकांना महावितरणने चांगलाच दणका दिला आहे. एका महिन्यात तब्बल 25 हजार 588 थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याची धडक कारवाई केली. यामुळे फुकट्या वीज ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याण परिमंडळात कल्याण, डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, मोखाडा, सफाळा, तलासरी, विक्रमगड,वसई, वाडा, विरार, आचोळे, नालासोपारा या कार्यालयांचा समावेश होतो. परिमंडळात महावितरणचे 24 लाख 96 हजार वीज ग्राहक आहेत. त्यापैकी 4 लाख 6 हजार वीज ग्राहकांकडे 203 कोटी 76 लाखांची थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे 101 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. तर पाणीपुरवठा, सार्कजनिक सेवा, पथदिवे, कृषिपंप आदी वर्गवारीतील ग्राहकांकडे 103 कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या आदेशानुसार मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडण्याची कारवाई सुरू केली. 1 डिसेंबरपासून आतापर्यंत 24 हजार 931 ग्राहकांचा वीजपुरकठा तात्पुरत्या स्वरूपात तर 657 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून चोरट्या मार्गाने विजेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
दंड भरल्याशिवाय पुन्हा जोडणी नाही
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर दंड भरून घेतल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. डिसेंबर महिन्यात कल्याण परिमंडळात सुमारे 27 लाख रुपयांचा दंड वसूल केल्यानंतरच 16 हजार 633 ग्राहकांची जोडणी पूर्ववत करण्यात आली. महावितरणने ग्राहकांसाठी वीज बिलांचा भरणा अधिक सुलभ केला असून त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पारंपरिक वीज बिल भरणा केंद्राशिवाय 24 तास कधीही भरणा करता येऊ शकणारे मोबाईल अॅप तसेच केवळ ग्राहक क्रमांक टाकून ऑनलाइन भरणा करता येऊ शकणारे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ उपलध करून दिले आहे.

























































