Kanahiya Kumar- आठ वेळा दगडफेकीनंतर आता कन्हैया कुमारवर चप्पलफेक

722

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार याला बिहारमध्ये पुन्हा एकदा विरोधाचा सामना करावा लागला. सोमवारी ‘जन गण मन’यात्रेसाठी लखीसराय येथे कन्हैया कुमार याने सभा घेतली. यावेळी त्याच्यावर चप्पल फेकण्यात आली. चप्पल त्याच्यापर्यंत पोहोचली नाही, मात्र कार्यकर्त्यांनी चप्पल फेकणाऱ्या तरुणाला पकडून त्याची धुलाई केली. दरम्यान, बिहारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कन्हैया कुमारवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्याच्या ताफ्यावर आठ वेळा दगडफेक झाली असून आता सभेदरम्यान चप्पलफेकही झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार लखीसराय येथील गांधी मैदानामध्ये सभेला संबोधित करत होता. यावेळी सभेमध्ये बसलेल्या एका तरुणाने कन्हैया कुमारच्या दिशेने चप्पल भिरकावली. दोघांमधील अंतर जास्त असल्याने चप्पल त्याच्यापर्यंत पोहचली नाही. यावेळी काही डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चप्पल फेकणाऱ्या तरुणाला पकडून मारहाण केली. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तरुणाची सुटका केल्याने अनर्थ टळला.

पोलिसांनी कन्हैयावर चप्पल फेकणाऱ्याला ताब्यात घेतले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चंदन कुमार असे आरोपी तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. कन्हैया कुमार देशामध्ये दंगल भडकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप चंदन याने केला. डाव्यांची विचारधारा कधीच देशासाठी उपयुक्त असणार नाही, असे म्हणत चंदन याने आपण देशभक्त असल्याचे म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या