कांदिवलीत दोन कंपन्यांना भीषण आग

628

कांदिवली, चारकोप विभागातील फ्रटाईल ज्यूस आणि एका चष्मा फ्रेम बनवणार्‍या कंपनीला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन्ही कंपन्यांमधील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले.

गव्हर्नमेंट इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असलेल्या या कंपनींमध्ये विविध फळांचे ज्यूस तयार करण्याचे काम चालते. त्यामुळे या कंपनींमध्ये विविध केमिकल्स आणि पॅकिंगचे पुठ्ठे आदी ज्वलनशील साहित्य येथे होते. त्यामुळे आग वेगाने भडकत गेली. तर चष्म्याच्या कंपनीमधील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. त्यामुळे सुमारे दोन तासांनी आग नियंत्रणात आल्याची माहिती घटनास्थळी तातडीने धाव घेणार्‍या शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी दिली. दरम्यान, आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, सुदैवाने यावेळी कंपनीत कामगार नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनी बंद असताना आग लागलीच कशी याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या