
नेपाळी जोडप्याची फसवणूकप्रकरणी एका महिलेला कांदिवली पोलिसांनी अटक केली. अटक महिला ही एका खासगी कंपनीत सिनिअर व्हिसा कॉन्सलर म्हणून काम करत होती. तक्रारदार हे नेपाळचे रहिवासी आहेत. त्याच्या पत्नीला लंडन येथे नोकरी करायची होती. त्यासाठी तिच्या नोकरीसह व्हिसा आणि स्वतःच्या डिपेंडंट व्हिसासाठी ते प्रयत्नशील होते.
तक्रारदार यांना सोशल मीडियावर एक जाहिरात दिसली. ती कंपनी परदेशातील विविध देशांत नोकरीसह व्हिसा दिल्याचे फोटो आणि व्हिडीओ दिसले. त्यामुळे त्याने त्या कंपनीला संपर्क साधला. संपर्क साधल्यावर कॉन्सलर आणि एकाने त्या जोडप्याला नोकरीसह व्हिसा देण्याचे आश्वासन देत त्याच्याकडून 27 लाख 44 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांना नोकरी आणि व्हिसा देण्यात आला नाही. त्याबाबत विचारणा केली असता ते टाळाटाळ करत होते. काही दिवसांनी त्या कार्यालयाला टाळे दिसले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.





























































