कांदिवलीत डंपरने अल्पवयीन मुलीला चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डंपरने अल्पवयीन मुलीला चिरडल्याची घटना आज दुपारी चारकोप परिसरात घडली. रितिका चौहाण असे मृत मुलीचे नाव आहे. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको केला होता. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी डंपरचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

रितिका ही कुटुंबीयांसोबत कांदिवलीच्या गणेशनगर येथे राहत होती. ती इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती. आज दुपारी रितिका ही रस्ता ओलांडत होती. तेव्हा भरधाव वेगातील डंपरने धडक दिली. डंपरच्या चाकाच्या खाली आल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

मुलीच्या अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी जमले. डंपरचालकाविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे काही काळ त्या परिसरात तणावाचे वातावरण होते. अपघाताची माहिती समजताच चारकोप पोलीस घटनास्थळी आले. काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक रहिवाशांनी डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली.