कंगना राणावतला ‘दहशतवाद’ भोवला; पंजाबमधील शेतकऱयांनी गाडी रोखली, घेराव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन काळय़ा कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱया अन्नदाता शेतकऱयांना खलिस्तानवादी दहशतवादी म्हणत बेताल बडबड करणारी अभिनेत्री कंगना राणावतला पंजाबमध्ये बळीराजाने चांगलाच झटका दिला. ‘कंगना कुंगना गो बॅक’ मुर्दाबाद, ‘माफी मांगे’ अशा घोषणा देत शेतकऱयांनी तिची गाडी अडवली आणि घेराव टाकला. यामुळे कंगनाला ‘दहशतवादी’ बडबड भोवली आहे.

कंगना राणावत हिमाचल प्रदेशहून परतत होती. पंजाबमध्ये पोहचताच चंदीगड-उना महामार्गावरील किरतपूर साहिब येथे जमावाने तिची कार अडवली. हे शेतकरी होते. त्यात महिलाही होत्या. शेतकऱयांना दहशतवादी, देशद्रोही म्हणणाऱया कंगना -कुंगनाने माफी मागावी अशी मागणी करत शेतकऱयांनी घोषणा दिल्या. शेतकरी महिलाही संतप्त झाल्या होत्या. तिच्या कारला घेराव टाकला. कंगना कारमध्येच बसून होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर एक तासाने तिची सुटका झाली.

सातत्याने बेताल बडबड

  • अभिनेत्री कंगना राणावत सातत्याने बेताल बडबड करते. केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात एक वर्षांपासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. सुमारे 700 शेतकरी यादरम्यान शहीद झाले. मात्र, पहिल्यापासूनच आंदोलक शेतकऱयांविषयी खलिस्तानवादी दहशतवादी असे आक्षेपार्ह वक्तव्य कंगना करत आहे.
  • वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्विटरने तिचे अकाऊंट बंद केले, तर तिने इन्स्टाग्रामवर बडबड सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही कंगनाने शेतकऱयांना खलिस्तानवादी, दहशतवादी म्हटले आणि वादग्रस्त पोस्ट केली.
  • दिल्ली विधानसभेने सोशल मींडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी कंगनाला समन्स बजावले आहे. 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता तिला हजर राहण्यास सांगितले आहे.

व्हिडिओ शेअर करत म्हणाली, हे खूप भयंकर आहे

शेतकऱयांनी अडविल्यानंतर कंगनाने कारमधून व्हिडिओ शूट करत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘पंजाबमध्ये पोहचताच जमावाने घेरले आणि माझ्या कारवर हल्ला केला. हे लोक स्वतःला शेतकरी म्हणवून घेत आहेत. मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत असा कांगावा कंगना करताना यात दिसत आहे. पोलीस होते म्हणून वाचले नाहीतर मॉब लिंचिंगच झाले असते, अशी बडबडही कंगनाने केली आहे.