
उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथील एक व्हिडियो सोशल मिडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये कार्यालयात काही अधिकारी चक्क दारू पिऊन तर्राट झालेले दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडियो देहात येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील अधिकारी कार्यालयातच दारू पित बसलेले असतानाचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडियो 1 वर्षे जुना असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तपास पथक तयार केले आहे तसेच याबाबत कारवाई करण्याविषयी बोलले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयाचे बारमध्ये रूपांतर केले असल्याचे दिसत आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याचे नाव सहाय्यक अवनीश कुमार असे आहे, तर दुसरे मुख्य सहाय्यक कमल अग्रवाल आहेत. व्हिडिओमध्ये इतर अधिकाऱ्यांचे चेहरेही स्पष्टपणे दिसत नाहीत. दारूची बाटली उघडताना वरिष्ठ सहाय्यक अवनीश कुमार अवनीश कुमार दारूची बाटली उघडत आहेत आणि कमल अग्रवाल त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसून फिल्मी स्टाईलमध्ये गात आहेत. गाता गाता ते दारूही पित आहेत. हे सर्व अधिकारी असे वागत आहेत, जसे ते सरकारी कार्यालयात नाही, तर एखाद्या बारमध्ये बसले आहेत. हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासासाठी दोन सदस्यीय पथक स्थापन करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले.
घडलेल्या या सर्व प्रकरणाबाबत कार्यकारी अभियंता नवीन शर्मा यांनी व्हायरल झालेल्या व्हिडियोविषयी सांगितले की, या व्हिडिओची दखल घेऊन याचा शोध घेण्याकरिता दोन सहाय्यक अभियंत्यांचे तपास पथक तयार करण्यात आले आहे. ते तीन दिवसांत अहवाल देतील. अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच या अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात येईल.



























































