खासदार श्रीनिवास पाटील कांताबाई सातारकर यांच्या आठवणीने भावूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या ग्रामीण महाराष्ट्राच्या करमणुकीची शान असणाऱया’रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर’ या तमाशा मंडळाच्या मालकीण कांताबाई सातारकर यांचे नुकतेच निधन झाले. संगमनेरसारख्या ग्रामीण भागात पन्नास वर्षाहून अधिक काळापूर्वी त्यांनी येथेच रहायचे ठरवले. त्यावेळी तमाशाचा फड उभा करण्यासाठी त्यांचा सुरू असलेला संघर्ष आणि एक महिला म्हणून येणाऱया अनेक प्रकारच्या अडचणींवर मात करीत आपला फड सावरण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. यावेळी त्यांना तमाशाचा फड उभा करण्यासाठी मदत करणारी व्यक्ती म्हणजे संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी आणि सातारचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे आहेत. त्यांनी नुकताच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, आमच्या साताऱयाला कुस्ती व तमाशाचे मोठे केंद्र आणि वारसा आहे. मलाही त्याची आवड असल्याने या क्षेत्रातील लोकांना अधिकारी म्हणून जमेल तशी मदत करायचो. 1969 मध्ये संगमनेरला प्रांताधिकारी असताना कांताबाई कलावंत असल्याची कल्पना नव्हती. एकेदिवशी त्या कार्यालयात आल्या. मी त्यांना कामाबाबत विचारले असता, आपण तमाशा कलावंत आहोत, पती तुकाराम खेडकर यांचे निधन झाले असून, मुले उघडय़ावर पडली आहेत. त्यांनी त्यांची सर्व परिस्थिती कथन करत आर्थिक मदतीचे अपेक्षा व्यक्त केली. माझ्याकडचे पैसे देऊ केले असता त्यांनी ते घेण्यास नकार दिला. तर कोणत्याही बँकेकडून मला कर्ज मिळवून द्या अशी विनंती केली. दुपारची वेळ असल्याने गाडीचा चालक बाहेर गेलेला होता. मग मी स्वतः त्यांना घेऊन स्टेट बँकेत गेलो. कर्जाबाबत व्यवस्थापकाशी चर्चा केल्यानंतर कोणी जामीनदार असेल तर आम्ही त्यांना कर्ज देऊ असे त्यांनी सांगितले. त्यावर मी स्वतः जामीनदार होत असल्याचे पाहून बँक व्यवस्थापकांनी एक लाख रुपयाचे कर्ज देतो असे सांगितले. परंतु कांताबाईनी फक्त दहा हजार रुपये कर्ज हवे असल्याचे सांगितले. काही मिनिटांतच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली अन् त्यांना दहा हजारांचे कर्ज मिळाले.

काही महिन्यानंतर मी हा प्रसंग विसरून गेला. दसऱयाच्या दिवशी होणाऱया एका कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलावले. कचेरीच्या मागे असलेल्या मैदानातील एका कट्टय़ाजवळ हा छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यावेळी कांताबाई त्यांची मुले आणि काही कलाकार हजर होते. या सर्वांनी माझ्यासमोर गणगवळण सादर केली. त्याचवेळी ‘कांताबाई सातारकरसह रघुवीर खेडकर लोकनाटय़ तमाशा मंडळा’चा श्रीगणेशा केला. त्याच जागेवरून ही मंडळी यात्रजत्रांमध्ये तमाशा सादर करण्यासाठी राज्याच्या दौऱयावर निघून गेली. काही महिन्यांचा दौरा आटोपून परत आलेल्या कांताबाईंनी बँकेत जाऊन व्याजासह दहा हजाराचे कर्ज चुकते केले.

पुढे काही वर्षांनी माझी संगमनेरहून बदली होत नंतर जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली. मित्र असलेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामतीला गेलो होतो. तेथून मित्रांसोबत गाडीत परतत असताना त्यांनी तमाशा बघायची इच्छा व्यक्त केली. कधीतरी तुम्हाला नक्की तमाशा दाखवील असे आश्वासन मी त्यांना दिले. योगायोगाने कुरकुंभच्या पुढे आल्यानंतर एके ठिकाणी तमाशाच्या तंबूचे दिवे लुकलुकताना दिसले. आम्ही तशीच गाडी तंबूकडे वळवली. आत जाऊन बघतो तर रंगमंचाच्या पडद्यावर माझा मोठा फोटो आणि नाव बघून माझ्यासह सर्वच आश्चर्यचकित झाले. याबाबत मला पुसटशीही कल्पना नव्हती. कांताबाई यांनादेखील आनंद झाला आणि तेथे मित्रांसोबत आम्ही गणगवळण बघितली. कांताबाईंनी सुद्धा आम्हाला चहापान करून आमचा यथोचित सत्कार केला.

खासदार झाल्यानंतर वाळवा तालुक्यातील कापुसखेड येथील यात्रेला कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गेलो, तर तेथेही त्यांचाच तमाशा होता. रघुवीर खेडकर यांनी माझ्या हस्ते श्रीफळ वाढवून येथील खेळाचा प्रारंभ केला.

कांताबाईंच्या तमाशाबाबत अशा अनेक आठवणी आहेत. आता या आठवणी मागे ठेवून कांताबाई अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच रघुवीर आणि त्याच्या सर्व बहिणींशी फोनवर बोलून त्यांचे सांत्वन केल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.