दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

प्रसिद्ध दिग्गज क्रिकेटपटू व टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे समजते.

16 वर्ष टीम इंडियाचे खेळाडू राहिलेल्या कपिल देव यांची एक ऑलराऊंडर म्हणून क्रिकेटजगतात ओळख आहे. कपिल देव यांच्या कप्तानीतच टीम इंडियाने पहिला वर्ल्डकप जिंकला आहे.

जाणून घ्या पूर्ण नाव

6 जानेवारी 1959 ला चंदीगडमध्ये जन्मलेल्या कपिल देव यांनी वयाची साठी पार केली असून 61 व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. कपिल देव यांचे पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे आहे.

19 व्या वर्षी केले होते पदार्पण 

कपिल देव यांनी वयाच्या 19 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यानंतर जवळपास 16 वर्षे आणि 16 दिवस कपिल देव यांनी हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये दणदणीत कामगिरी केली.

131 कसोटी सामने सलग खेळले

16 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये कपिल देव हे तब्येतीच्या कारणामुळे एकाही लढतीला मुकले नाहीत. कपिल देव कधी अनफिटही झाले नाही आणि कधी दुखापतग्रस्तही झाले नाही. त्यांनी जवळपास 131 कसोटी सामने सलग खेळले.

रेकॉर्ड 

131 कसोटी लढती खेळणारे कपिल देव त्यावेळी एकमेव अष्टपैलू खेळाडू होते. यात त्यांनी 400 पेक्षा जास्त बळी आणि 4000 पेक्षा जास्त धावांची नोंद केली.

आपली प्रतिक्रिया द्या