
पाकिस्तानात हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात हिंदू मंदिराची तोडफोड झाली आहे. गेल्या 22 महिन्यांमधला हा नववा मोठा हल्ला आहे.
कराची हे शहर पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. इथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये हिंदूंचं प्रमाण अधिक आहे. तरीही या शहरात हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. कराचीतील नरियान पुरा भागात हे मंदिर आहे. कडवट विचारसरणीच्या काही माथेफिरूंनी या मंदिराची तोडफोड केली आहे. या हल्ल्यात मंदिरातील मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे. या मूर्तींमध्ये दुर्गा देवीच्या मूर्तीचा समावेश आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानात हिंदू मंदिरांच्या संरक्षणाचा दावा केला असला तरीही मंदिरांवर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. उलट, ते वाढत चालले आहेत. त्यामुळे खान यांचा दावा पोकळ असल्याचं सिद्ध होत आहे.
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातील पंजाबमध्ये काही माथेफिरूंनी गणेश मंदिरावर हल्ला करून ते नष्ट केलं होतं. या हल्ल्यानंतर इम्रान खान यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यानंतर 24 तासांनी खान यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. या मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल, असं आश्वासनही खान यांनी दिलं होतं. मात्र, कडवट विचारसरणीच्या लोकांकडून विरोध झाल्यानंतर त्यांनी आपलं वचन पाळलं नाही.





























































