
बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर स्वतःच्या शरीराविषयी खूप हळवा आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत करण जोहरने कित्येक वर्षांपासून बॉडी डिस्मॉर्फिया डिसॉर्डर आजाराला तोंड देत असल्याचे सांगितले. आजही हा आजार त्याची पाठ सोडत नाही. स्वतःला आरशात बघायला हिंमत होत नाही, असे करणने म्हटलेय.
बॉडी डिस्मॉर्फिया आजार हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती आपल्या शरीराबद्दल खूपच टोकाचा आणि वाईट विचार करतो. त्याला आपलं शरीर आवडतं नाही, किंबहुना त्यात काही ना त्रुटी आढळून येतात आणि ती व्यक्ती स्वतःला दोष देत राहते. या आजारात रुग्णाचं लक्ष बहुतेकदा त्याच्या शरीरावर केंद्रित राहतं आणि कालांतराने त्यांना आपल्या शरीराची चीड येऊ लागते. त्यांना सतत असं वाटत राहतं की, त्यांचं शरीर हे वाईट आहे. बॉडी डिस्मॉर्फिया डिसॉर्डर किंवा बॉडी डिस्मॉर्फिया हा मानसिक आजार किशोरवयीन मुलांना होतो. मात्र आजकालच्या बदललेल्या परिस्थितीत तो कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो.
बॉडी डिस्मॉर्फियाची लक्षणं
जर एखाद्याला बॉडी डिस्मॉर्फिया झाला असेल तर तो नेहमीच त्याच्या शरीराच्या एका विशिष्ट भागाबद्दल चिंतित असतो. बहुतेक वेळा तो त्याच्या शरीराची तुलना दुसऱयांशी करत राहतो. तो दिवसातून अनेक वेळा आरशात स्वतःला पाहत राहतो. अनेकदा केस विंचरणं, केसांशी चाळा करत राहणं, सतत चेहरा स्वच्छ धुवत राहणं, कारण नसताना आरशात एकटक चेहऱयाकडे पाहत बसणं, मेकअप करणं, सतत कपडे बदलत राहणं, त्वचेवर काही ना काही प्रयोग करत राहणं, ही बॉडी डिस्मॉर्फियाची काही लक्षणं मानली जातात. आधी सांगितल्याप्रमाणे हा एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये रुग्णांला इतर लोक काय सल्ला देतात तो कळत नाही किंवा तो समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे तो सतत नकारात्मक विचार करत राहतो.
- अॅनल्स ऑफ इंडियन सायकॅट्री जर्नलनुसार बॉडी डिस्मॉर्फिया डिसॉर्डरने जगभरातील 2.4 टक्के लोक त्रस्त आहेत. हिंदुस्थानात दरवर्षी 10 लाख लोकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळतात.