
अभिनेत्री करीना कपूर हिच्या मुलाचे नाव जेह असल्याच्या बातम्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या. तिचे वडील रणधीर कपूर यांनी आपल्या नातवाचे नाव जेह असल्याचे म्हटले होते. यामुळे त्याचे नाव जेह असे ठेवण्यात आल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. करीनाने एक पुस्तक प्रसिद्ध केले असून यामध्ये तिने गर्भवती असताना काम आणि घर याच्या जबाबदाऱ्या कशा पेलल्या त्याचे अनुभव लिहिले आहेत. करीना आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्याने बराच वादंग निर्माण झाला होता. हिंदुस्थानावर आक्रमण करत देशाची लूट करत प्रचंड नरसंहार करणाऱ्या आणि महिलांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्याचे नाव तुम्ही कसे काय ठेवू शकता असा सवाल अनेक संतप्त मंडळींनी केला होता.
करीनाने लिहिलेल्या पुस्तकामध्ये तिने तिच्या मुलाचा उल्लेख जहांगीर असा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर करीना आणि सैफ अली खान त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय ठेवतात याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. 21 फेब्रुवारी 2021 ला करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. करीना ही सध्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या तिच्या नव्या चित्रपटासाठी मेहनत घेत असून यात आमिर खान हा मुख्य भूमिकेत आहे.





























































