कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात: महायुतीने विरोधकांना धक्का

108

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 7 मधून आज शनिवारी कर्जतचे आराध्य दैवत धापया महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. युती होत नाही हे चित्र पक्के झाल्याने विरोधक बिनधास्त होते मात्र ऐन वेळी महायुती जाहीर झाल्याने विरोधकांना मोठाच धक्का बसलाय.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संतोष भोईर, कर्जत शहरप्रमुख भालचंद्र जोशी, भाजप महिला प्रदेश सरचिटणीस कल्पना दास्ताने, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल डाळिंबकर आदी महायुतीचे नेते व थेट नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशींसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या प्रचार प्रसंगी धापया देवस्थान येथे कॉर्नर सभा घेण्यात आली.

सध्या वसंत ऋतू सुरू असून कर्जत नगरपरिषदेत सुवर्णा जोशी यांच्यामुळे सुवर्णकाळ येणार आहे. मागील वेळेस महायुतीचा निसटता पराभव झाला होता. मात्र यावेळेस डोळ्यात अंजन घालून रहा कार्यकर्त्यांनो. शत्रू चाणाक्ष आहे मी 1980 पासून त्यांच्या सोबत काम केल्याने ते कोणते डावपेच खेळतील हे मला चांगलं माहीत आहे, असे वसंत भोईर यांनी स्पष्ट केले.

लोक जातीपातीच्या राजकारणाला कंटाळले आहेत. त्यांना आता बदल हवा आहे. जनता कोणाच्या मागे आहे हे उमेदवारी अर्ज भरताना दिसलंच आहे. बाकीचं चित्र निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईल, असे उद्गार शिवसेनेचे विधानसभा संघटक संतोष भोईर यांनी यावेळी काढले.

काल राष्ट्रवादी पक्षाने निर्धार मेळावा कर्जत येथे घेतला. हा निर्धार मेळावा देशासाठी नसून केवळ कर्जत नगरपालिका निवडणुकीसाठीच घेतला होता, असा आरोप आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी केला आहे.

कर्जत नगरपरिषदेसाठी महायुती अचानक जाहीर झाली. या गोष्टीचा विरोधकांना शॉक बसला आहे. निर्धार मेळाव्यात जे कोल्हेकुई देऊन गेलेत त्यांना पुढील प्रचार सभेत थेट उत्तर मिळेल, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या