कर्नाक पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

सीएसएमटी आणि मस्जिद बंदरदरम्यानचा 150 वर्षांहून जुना असलेला कर्नाक बंदर पूल लवकरच वाहतुकीसाठी संपूर्ण बंद करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2014 मध्ये अवजड वाहनांसाठी हा पूल  यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. मध्य रेल्वे, आयआयटी आणि पालिकेच्या तंत्रज्ञांनी मंगळवारी केलेल्या संयुक्त पाहणीत या पुलाचे आयुर्मान केव्हाच संपले असून या पुलाचा रेल्वे मार्गावरील भाग धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कल्याणच्या पत्री पुलाचे बांधकाम धोकादायक ठरवून तो हटविण्यात आल्यानंतर आता कर्नाक बंदरच्या ब्रिटिशकालिन पुलाचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे. पालिकेने हा पूल पाडण्याचे मध्य रेल्वेला आदेश दिले आहेत. परंतु हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीच्या आधीच जर हा पूल पाडला तर वाहतुकीचा विचका होऊ शकतो. त्यामुळे मध्य रेल्वेने पुन्हा मंगळवारी ‘सेंकड ओपिनियन’ घेऊन पाहिले, परंतु पुलाची स्थिती जीर्ण झाली असून तो लवकरात लवकर पाडावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने मध्य रेल्वेला हँकॉक आणि कर्नाक पूल  पाडण्याचे पैसे यापूर्वीच दिले आहेत. तसेच कर्नाक पूल  बांधण्याचे टेंडरही पालिकेने काढले असून कंत्राटदारही नेमण्यात आला आहे. कर्नाक बंदर पुलाचे आयुष्य संपले असून त्यावरील हलक्या वाहनांची वाहतूकही थांबवून तो केवळ पादचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी ठेवावा असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.