
कर्नाटक येथील एका कॉलेजने विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्यास मनाई केली आहे. या बंदीला मुस्लीम विद्यार्थिनींनी विरोध केला आहे. त्यावरून आता नवीन वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
कर्नाटकमधील उडुपी येथे महिला पी. यू. महाविद्यालयातील सहा मुस्लीम विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की महाविद्यालयातील प्राचार्यांनी त्यांना वर्गात हिजाब घालण्यास मनाई केली आहे. तसंच त्यांना अरबी आणि बेरी या भाषांमध्ये संभाषण करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
या बंदीविरोधात तीन दिवस विद्यार्थिनी वर्गाबाहेर उभ्या राहून निषेध नोंदवत होत्या. अखेर, त्यांनी पालकांना यात मध्यस्थी करण्याची विनंती केली. मुलींच्या विनंतीवरून पालकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य रूद्र गौडा यांची भेट घेतली. पण, त्यावर कोणतंही भाष्य करण्यास गौडा यांनी नकार दिल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून हिजाब घालून गेल्यामुळे वर्गात प्रवेश देण्यात आलेला नसल्याचा आरोप या मुलींनी केला आहे. जर असंच होत राहिलं तर कमी उपस्थितीचा परिणाम त्यांच्या महाविद्यालयीन प्रगतीवर होईल, अशी भीती या विद्यार्थिनींना वाटत आहे.
दुसरीकडे, प्राचार्य रूद्र गौडा यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब परिधान करू शकतात. पण, वर्गांच्या आत हिजाब घालण्यास मनाई आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी हा नियम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.





























































