
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकारवरील संकटांचे ढग अधिक गडद झाले आहेत. दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार अडचणीत आले असून सत्ता स्थापनेसाठी भाजप मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
2 Independent MLAs, H Nagesh and R Shankar, withdraw their support from Karnataka govt. pic.twitter.com/C34u3BNFOb
— ANI (@ANI) January 15, 2019
लोकसभा निवडणुकांपूर्वी कर्नाटकामध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे. या राजकीय घडामोडींमुळे कर्नाटकातील वातावरण तापले आहे. तर सत्तास्थापनेसाठी भाजपने हालाचाली सुरू केल्या आहेत. येत्या आठवडाभरात कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन होईल असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. भाजपचे सर्व 104 आमदार तीन दिवसांपासून दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व आमदार पक्षाध्यक्ष अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, राज्यातील हालचाली पाहता, त्यांनी दिल्लीतच मुक्काम ठोकला आहे. तसेच पक्षामध्ये बैठकांचे सत्रही सुरू आहे.
H Nagesh, Independent MLA :My support to coalition govt was to provide good&stable govt which utterly failed. There’s is no understanding among coalition partners. So, I decided to go with BJP to install stable govt & see that govt performs better than the coalition. #Karnataka pic.twitter.com/hcMnaXaHZd
— ANI (@ANI) January 15, 2019
गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. मात्र, बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही. त्यानंतर काँग्रेसच्या आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर जेडीएसने सरकार स्थापन केले. सत्तास्थापनेनंतर काँग्रेस आणि जेडीएसमधील अंतर्गत कलह नेहमी चव्हाट्यावर येत होते. त्यातच आमामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षांत तणाव वाढला होता. त्यातच भाजप सत्तास्थापनेच्या संधीची वाटच पाहत होता. काँग्रेस-जेडीएसमधील तणावामुळे भाजपला आयतीच संधी मिळाली. त्यामुळे आता कर्नाटकात नेमके काय होणार याबाबत तर्कवितर्क करण्यात येत आहेत.
आमचे सर्व आमदार एकत्र असून सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, काँग्रेसमधील काही आमदार नाराज असून ते फुटण्याची भीती काँग्रेसला सतावत आहे. काँग्रेसचे 10 आणि जेडीएसचे तीन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि जेडीएसने केला आहे.
























































