
सामना प्रतिनिधी । वलांडी
कर्नाटकच्या कानडी अधिकाऱ्यांच्या दादागिरीने ऐन दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळवल्याने देवणी तालुक्यातील सिंधीकामठ परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रोश केला आहे. लोकप्रतिनिधीच्या तोंडाला पट्टी तर प्रशासन हातबल असल्याचे दिसत आहे. कर्नाटकने महाराष्ट्राच्या सीमाभागात दिवसाढवळ्या घुसून देवणी तालुक्याचे पाणी पळवल्याने संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्याच्या मांजरसुंब्यावरून उगम पावणारी व देवणी तालुक्यातून एकमेव दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी ‘मांजरा नदी’ असून या नदीवर सिंधीकामठ ता. देवणी येथे पंधरा वर्षापूर्वी मोठा ‘कोल्हापुरी बंधारा’ महाराष्ट्र व कर्नाटकच्या समान निधीतून बांधण्यात आला आहे. दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागातील जनतेने समसमान पध्दतीने पाणी वापर करावा अशा करारावर हा बंधारा बांधला गेला.

महाराष्ट्र कर्नाटकच्या समान पाणी वापरावर अत्याचार करीत गुरूवारी दुपारी कर्नाटकच्या तालुका भालकी जि. बिदर येथील महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात सिंधीकामठ येथील कोल्हापूरी बंधाऱ्यांचे पोलादी गेट जे.सी. बी. च्या सहाय्याने दमदाटीने उघडून पाणी पळवले. दरम्यान महाराष्ट्राच्या सिंधीकामठ विजयनगर येथील शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पोलीस बळाचा वापर केल्याने विजयनगर येथील एका तरुण शेतकऱ्याने जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक पोलीस व ग्रामस्थांनी त्यांना पाण्याबाहेर काढले.
महाराष्ट्रातील सीमाभागातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाताना होणारा टोकाचा विरोध देवणी तहसिलदारांसह पोलीस यंत्रणा उपस्थित राहूनही भालकी तहसिल प्रशासनाने अखेर दांडगाईने गेट काढल्याने सीमा भागातील नदीकाठावर अवलंबून नागरिकांना ऐन दूष्काळाच्या परिस्थितीत झालेल्या अन्यायाने पाण्याअभावी आर्थिक टंचाई व पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. समसमान पाणी वापराची वाटपाचा ठराव होऊन बांधलेल्या बंधाऱ्यांचा जास्ती जास्त लाभ कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना व्हावा अशा एकमेव उद्देशापोटी मांजरा नदीवर मानकेश्वर तुगाव ईंचूर जिरग्याळ आदी ठिकाणी बंधाऱ्यांची साखळी असतानाही केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी सिंधीकामठ येथील बंधाऱ्याचे गेट उघडल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करीत आहेत.
स्थानिकांची सोय व विरोध डावलून भालकीचे तहसिलदार स्वामी यांनी पोलीसांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने बंधाऱ्याचे गेट काढले असून या संबंधी भालकीच्या तहसिलदारांनी वरिष्ठ पातळीवरून याबाबत आदेश आल्याचे सांगितल्याची प्रतिक्रिया देवणी तहसिलदारांनी व्यक्त केली.
























































