
सामना ऑनलाईन । बंगळुरू
एखाद्या हॉटेलात किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर जेवणावर किंवा तेथील सेवेवर खूश होऊन टीप देण्याची पद्धत आहे. मात्र, कर्नाटकात एका मंत्र्याने जेवण बनवणाऱ्या कूकला चक्क 25 हजार रुपयांची टीप दिली आहे. तसेच त्याने बनवलेल्या जेवणाची प्रशंसाही केली. मंत्रीमहोदय त्या कूकने बनवलेल्या जेवणावर ऐवढे खूश झाले की त्यांनी कूकला मक्केला पाठवण्याचे आश्वासनही दिले.
कर्नाटकातील मंत्री जमीर अहमद खान एका बैठकीसाठी बोलियारमध्ये गेले होते. कामकाज आटोपल्यावर येथील एका फिश रेस्टॉरंटमध्ये ते गेले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीही होते. खान यांनी पॉम्फेट, अंजलसह इतर माशांची ऑर्डर दिली. त्यांना जेवण आवडल्याने त्यांनी कूकला बोलवण्यास सांगितले. कूक हनीफ मोहम्मद मंत्र्यासमोर आल्यावर खान यांनी त्याला आपल्यासोबत बसवले. त्याला आपल्यासोबत खाण्यास सांगितले. त्याने बनवलेल्या डिशेशचे त्यांनी कौतुक केले. अशाप्रकारचे सी फूड याआधी आपण कधीच खाल्ले नसल्याचे त्यांनी सांगितले. हनीफवर खूश होऊन त्यांनी हनीफ आणि कर्मचाऱ्यांना 25 हजाराची टीप दिली. तसेच हनीफची माहिती लिहून घेण्यास सहकाऱ्यांना सांगितले. त्याबरोबरच हनीफला मक्केला पाठवण्याचे आश्वासनही खान यांनी दिले.
खान यांनी केलेल्या स्तुतीने भारावून गेल्याचे हनीफ यांनी सांगितले. याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि गुलाम नबी आझाद यांनीही आपल्या हातचे जेवण चाखले आहे. त्यांनाही आपले जेवण आवडले होते. मात्र, खान यांच्याप्रमाणे कोणीही तारीफ केली नव्हती. आपल्या 18 वर्षांच्या कार्यकाळातील हा संस्मरणीय प्रसंग असल्याचे हनीफ यांनी सांगितले. तीन वर्षापूर्वी हनीफ आखाती देशात काम करत होते. त्यानंतर कर्नाटकात अंसार या मित्रासह भागीदारीत त्यांनी रेस्टॉरंट सुरू केले. याआधीही खान यांनी सढळ हाताने अनेकांना मदत केली आहे. जोडूपूलामध्ये भूस्खलनानंतर बचावकार्यात मदत करणाऱ्या चार तरुणांना खान यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले होते. तर एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या स्नेहदीप या संस्थेला त्यांनी 10 लाखांची देणगी दिली आहे.






























































