
सामना ऑनलाईन। वाराणसी
अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्याऐवजी सरकार त्यांचा भव्य पुतळा उभारणार आहे. ज्या राम प्रभुंनी पृथ्वी एक केली त्यांचा पुतळा उभारण्यात काय अर्थ आहे ? असा सवाल करीत केंद्र सरकार देशात पुतळे उभारत चाललेय ,पण हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिर उभारणीचे मात्र सरकारला गांभीर्य नाही अशी खंत ज्योतिष द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केली आहे. ते वाराणसीच्या गोवर्धन येथे सुरु असलेल्या परमधर्म संसदेत बोलत होते.
प्रभू रामचंद्रांचा २२१ मीटर उंचीचा पुतळा अयोध्येत उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यावर भाष्य करताना शंकराचार्य म्हणाले, जगाचा पालनहार प्रभू रामचंद्रांचा पुतळा उभारून त्यांना वंदन करणे मला तरी पटत नाही. कारण भगवान रामाच्या तेजोमय जीवनाची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही .त्यापेक्षा सरकारने देशातील हिंदूंच्या भावनांचा आदर करीत अयोध्येतील जन्मभूमीवर राम मंदिर उभारणीला प्राधान्य द्यावे अशी माझी प्रामाणिक भावना आहे.




























































