
जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘7 आवाहनां’वर काँग्रेस खासदार कार्ती चिंदबरम यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने तातडीने संसदेचे अधिवेशन बोलवून देशाला या आवाहनांमागील नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
कार्ती चिदंबरम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून अत्यंत गंभीर स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सूचनांमागे नेमकी कोणती परिस्थिती आहे, हे देशासमोर मांडणे आवश्यक आहे. “सरकारने संसद अधिवेशन तातडीने बोलवावे, देशाला विश्वासात घ्यावे आणि सध्याच्या परिस्थितीचे वास्तव काय आहे, हे स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
चिदंबरम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर MyGov च्या पोस्टला उत्तर देताना ही भूमिका मांडली. MyGov च्या पोस्टमध्ये “राष्ट्र सर्वप्रथम, कर्तव्य आरामापेक्षा वरचढ!” या शीर्षकाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलेल्या सात आवाहनांचा उल्लेख करण्यात आला होता.
या आवाहनांमध्ये शक्य असेल तेथे ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देणे, इंधनाचा वापर कमी करणे, एक वर्ष परदेश प्रवास टाळणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवणे, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाचा वापर कमी करणे, नैसर्गिक शेतीकडे वळणे आणि अनावश्यक सोन्याची खरेदी टाळणे, अशा बाबींचा समावेश होता.
These are very serious “directives” from the @PMOIndia, what are the triggers for this? The Government must convene Parliament immediately & take the nation into confidence & inform us about the true state of affairs which has necessitated these “appeals”. https://t.co/aEw3V6Gg6H
— Karti P Chidambaram (@KartiPC) May 11, 2026
MyGov च्या पोस्टमध्ये पुढे म्हटले होते की, नागरिकांनी सामूहिक जबाबदारीची भावना स्वीकारल्यास हिंदुस्थान अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर होऊ शकतो.



























































