जुन्या साड्यांवर प्रक्रिया केलेले पाणी पंचगंगेत सोडणाऱ्यांवर कारवाई करा, करवीर शिवसेनेची मागणी

जुन्या साड्यांवर रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर नदीपात्रात धुऊन पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करा. तसेच अशा जुन्या साड्या नव्या भासवुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर ‌कारवाई करा अशी मागणी आज करवीर शिवसेनेच्या वतीने करवीर प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली. प्रांताधिका-यांचे स्वीय सहाय्यक संजय घोरपडे यांनी निवेदन स्वीकारुन कारवाईची ग्वाही दिली.

जिल्ह्यात घरोघरी फिरून विविध वस्तूंच्या बदल्यात जुन्या साड्या घेतल्या जातात. अशा जुन्या साड्यांची उंचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांचे गोदामे असून त्या रात्री-अपरात्री रासायनिक प्रक्रिया करुन नदीच्या पाण्यात धुतल्या जातात. त्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठी भर पडते. तसेच या धुतलेल्या साड्यांवर इस्त्री करून प्रसिद्ध बाजारपेठेत, दुकानात विक्रीसाठी ठेवून ग्राहकांची फसवणूक ही केली जाते.

एकीकडे केंद्र व राज्य शासन पंचगंगा नदी प्रदूषण होऊ नये म्हणून कोट्यावधीचा निधी तसेच उपायोजना,जनजागृती करत असताना काही व्यापारी मात्र अशाप्रकारे नदीचे खुलेआम प्रदुषण करताना दिसत आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही यासंदर्भात कारवाईची मागणी करण्यात आली होती. पण प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने दखल घेतली नाही.

सध्या असा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस अधिक भर पडत आहे. शिवाय या जुन्या साड्या प्रक्रिया करून बाजार पेठेत नविन साड्या म्हणून ग्राहकांच्या गळ्यात मारण्यात येत आहे. अशा टोळ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रशासनाने गांभीर्य न दाखविल्यास अशा बेफिकीर व्यापा-यांना शिवसैनिक धडा शिकवतीत असा इशाराही शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजु यादव यांनी यावेळी दिला. यावेळी संतोष चौगुले, दिलीप सावंत, दीपक पोपटानी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, योगेश लोहार, अजित चव्हाण, भूषण चौगुले, अजित पाटील, ओंकार जोशी, अकबर फकीर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या