
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीरी तरुण दहशतवादाच्या विळख्यात अडकत असून यावर्षी मोठ्या संख्येने तरुण विविध दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचे समोर आले आहे. 2010 सालानंतर यावर्षी सर्वाधिक कश्मीरी तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश केला आहे. गृह मंत्रालयाने यावर्षी 31 जुलै पर्यंत दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेल्या कश्मीरी तरुणांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार 2010 नंतर यावर्षी सर्वाधिक म्हणजे 131 कश्मीरी तरुणांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारला आहे.
दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या तरुणांमधील अधिकांश तरुण अल-कायदाशी संबंधित संघटनांमध्ये सामील झाले आहेत. तर अनेक कश्मीर तरुण अंसार गजवत-उल- हिंद या दहशतवादी संघटनेत सामील झाले आहेत. ही दहशतवादी संघटना अल कायदाचे समर्थन करते. या संघटनेचा म्होरक्या झाकीर रशीद भट उर्फ झाकिर मुसा आहे. तो पुलवामातील त्राल गावचा रहिवासी आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनांमध्ये मोठया संख्येने सामील होणारे तरुण हे दक्षिण कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत या जिल्ह्यातील 35 तरुण दहशतवादी संघटनेत सामील झाले आहेत. गेल्या वर्षी 126 स्थानिक नागरिक विविध दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. त्या तुलनेत यावर्षी दहशतवादी संघटनेत सामील होणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. सुऱक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार शोपिया, पुलवामा, अनंतनाग,कुलगाम आणि अवंतीपुरा जिल्ह्यातील 100 हून अधिक तरुण यावर्षी विविध दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत.
कश्मीरमध्ये अंसार गजवत उल- हिंद कडे कश्मीरी तरुण आकृष्ट होत असून अल्पावधीतच ही संघटना तरुणांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या संघटनेचा म्होरक्या मुसा हा असा एकमेव दहशतवादी आहे ज्याच्यामुळे 27 वर्ष जुन्या हुरियत फुटीरतावाद्यांचे कश्मीरमधील वर्चस्व कमी झाले आहे.

























































